धक्कादायक ; दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न : जुन्या वादातून महिलांसह तिघांना जबर मारहाण, एक जण गंभीर.

Spread the love

अमळनेर :- सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच अमळनेर तालुक्यातील तरवाडे गावात जुन्या वादातून दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, तिघांना जबर मारहाण करण्यात आली. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी 9 जणांविरुद्ध विनयभंगासह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धमकी

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची वहीणी गावातील सार्वजनिक नळावर धुणे धुण्यासाठी गेले होते. धुणे धुऊन परत येत असतांना ९.३० वाजेच्या सुमारास गावदरवाज्याजवळ विनोद पवार याने त्यांना अडवले. ‘आमच्या विरुध्द केलेल्या केसेस मागे घ्या. नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत त्याच्यासह शरद उखा पवार याने महिलेचा विनयभंग केला. यानंतर पिडीत महिलेने तिथून पळ काढला.

पीडितेला जबर मारहाण

त्यानंतर नऊ जण पुन्हा एकदा पिडीत महिलेच्या घरासमोर गेले. यात विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रुपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार, रतीलाल रामलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील व प्रमोद रतीलाल पाटील यांचा समावेश हाेता. या जमावाने लाकडी, लोखंडी रॉड, पेट्रोलने भरलेल्या बाटलीसह पिडीत महिलेवर हल्ला केला. पिडीतीची आई, वहीणी, यांच्या अंगावर शरद पवार याने बाटलीमधील पेट्रोल टाकले व विनोद सुकदेव पवार याने त्याच्या काडीपेटीने जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

इतरांनाही लाथा-बुक्क्या

आरोपींनी इतर लोकांनाही धक्काबुक्की व चापटा बुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पिडीत महिलेचा भाऊ गंभीर झाला आहे. तसेच सतिष पाटील यांना देखील मार लागल्याने दोघांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नऊ जणांच्या विरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाने तपास करीत आहेत.

एक जण आयसीयूत

गंभीर जखमी अवस्थेत असलेले सतिष पाटील बेशुद्ध आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आयसीयूत उपचार सुरू आहे.

गुन्हा दाखल :

दरम्यान, या प्रकरणी विजय सदाशिव पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवाड पोलीस ठाण्यात विनोद सुखदेव पवार, नितीन उखा पवार, रूपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार सर्व राहणार तरवाडे ता. अमळनेर, रतिलाल , रामलाल पाटील, हर्षल रतिलाल पाटील आणि प्रमोद रतिलाल पाटील सर्व रा. पिंपळे तालुका अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ३०७, ३५४, ३४१, १४३, १४४, १४८, १४९, ३२३, ५०६ व म.पो. अधिनियम ३७ (१), ३७ (३), १३५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे हे करीत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार