मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२२ च्या ब गटाचा शेवटचा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा झाला. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली तर अ गटाचा शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग असा झाला. पाकिस्तानने सहज विजय मिळवत अंक तालिकेतील सरासरी वाढवली. त्याचा फायदा त्यांना पुढे होण्याची शक्यता आहे. भारताने हाँगकाँगला जितक्या (४०) धावांनी पराभूत केलं साधारण तितक्याच धावांमध्ये पाकिस्तानने त्यांचा संपूर्ण संघ (३८) गुंडाळला होता किंवा दुसर्या शब्दांत सांगायचं झालं तर हाँगकाँगने भारता विरुद्ध जित्यक्या (१५२) धावा काढल्या साधारण तितक्याच (१५५) धावांनी पाकिस्तानने हाँगकाँगवर विजय मिळवला.
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका सुपर४ मध्ये पोहचले. सुपर४च्या पहिल्या सामन्यात पुन्हा अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. साखळीतल्या पराभवाचा बदला श्रीलंकेने घेतला खरा पण त्यांना ह्या विजयासाठी घाम गाळावा लागला. सुपर४चा दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अटीतटीचा झाला. पण साखळीतल्या पराभवाचा बदला पाकिस्तानने घेतला. कोहलीने सलग दुसर्या सामन्यात अर्धशतक झळकावले, पण तेही संथ गतीने. आज भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. डावाच्या दुसर्या षटकात माहिश ठिकशानाने राहुलला ६ धावांवर बाद केले. सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकवलेला विराट खेळपट्टीवर उतरला. पण त्याचं पितळ उघड पडलं. दर्जेदार संघाविरुद्ध त्याची बॅट धावा काढत नाही. त्याचा शून्यावर त्रिफाळा दिलशान मधुशंकाने उध्वस्त केला.
रोहीत आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरला. दोघेही लयीत असताना रोहीत बाद झाला आणि ९७ धावांची भागीदारी खंडीत झाली. चमिका करुणारत्नेने त्याला बाद केले. रोहितने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावा काढल्या. दासन शनाकाने सूर्यकुमारला ३४ धावांवर बाद करत पुन्हा दोन नवे फलंदाज खेळपट्टीवर आणले. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत धावगती वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते पण दासन शनाकाने १७ धावांवर पांड्याला बाद केले. हुडा जास्त काही करण्यापूर्वीच दिलशान मधुशंकाच्या तावडीत सापडला. त्याच षटकात दिलशानने पंतला १७ धावांवर बाद केले. भुवनेश्वर कुमारचा त्रिफाळा शून्यावर चमिका करुणारत्नेने उध्वस्त केला. अश्विनने नाबाद १५ धावा काढत २० षटकांच्या अखेरीस धावसंख्या १७३/८ अशी झळकावली.
भारतीय गोलंदाजी आज पुन्हा पूर्णपणे कोलमडलेली होती. भुवनेश्वर, सिंग आणि पांड्याच्या १२ षटकांमध्ये १०५ धावा काढल्या गेल्या आणि एकही गडी बाद झाला नाही. तर अनुभवी अश्विनने ३२ धावांमध्ये १ गडी केला तर यझुवेंद्र चहलने ३४ धावांमध्ये ३ गडी बाद केले. श्रीलंकेच्या डावाची सुरूवात सलामी फलंदाज पॅथम निसंका आणि यष्टिरक्षक कुशल मेंडीस यांनी केली. चहलने टाकलेल्या डावाच्या १२व्या षटकात निसंका ५२ धावांवर तर मेंडीस ५७ धावांवर लागोपाठ बाद झाले. ९७ धावांची ही भागीदार भेदल्यानंतरही भारतीय गोलंदाज विजयाच्या मार्ग निर्माण करू शकले नाहीत. पुढच्याच षटकात चहलने चरिथ असलंकाला शून्यावर बाद केले. तर अश्विनने दानुष्का गुणथिलकाला १ धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. भानुका राजपक्षे आणि कर्णधार दासन शनाकाने अधिक पडझड न होऊ देता झटपट धावा जमा केल्या. राजपक्षेने नाबाद २५ तर शनाकाने नाबाद ३३ धावा काढत श्रीलंकेच्या संघाला अंतीम फेरीत स्थान मिळवून दिलं. श्रीलंकन संघाची तिन्ही विभागांत कामगिरी भारतापेक्षा सरस राहिली त्याचंच बक्षिस त्यांना मिळालं. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी जरतरची गणितं जुळावी लागतील.
प्रमुख गोलंदाजांची अनुपस्थिती आणि खेळवलेल्या गोलंदाजांचं अपयश भारताला पराभव देऊन गेला.
कर्णधार दासन शनाकाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने २ षटकांत २६ धावांमध्ये २ गडी बाद केले होते तर नंतर फलंदाजी करताना उपयुक्त नाबाद ३३ धावा काढल्या होत्या.
भारताचा सुपर४ मधला शेवटचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध ८ सप्टेंबर रोजी होणार आहे.