स्व.अॅड. रावसाहेब शिंदे यांचा आत्मीय आग्रह आणि स्नेहीजणांच्या प्रेमामुळे श्रीरामपूरला स्थायिक झालो – प्राचार्य शेळके

Spread the love

शिरसगाव | प्रतिनिधी

शिरसगाव :- श्रीरामपूर हे माझ्या जीवनातलं एक आदर्श स्थान आहे,या शहराने मला खूप सन्मान दिला माझा मुलगा डॉ. संजय शेळके येथेच घडला, वाढला, शिकला आणि त्यास मोठा मित्रपरिवार लाभला,माझा दीर्घकाळ येथे गेला अॅड. रावसाहेब शिंदे यांचा आत्मीय आग्रह आणि स्नेहीजनांच्या प्रेमामुळे मी श्रीरामपूरला स्थायिक झालो असे भावपूर्ण उदगार माजी प्राचार्य टी.ई.शेळके यांनी काढले.
येथील माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे यांनी माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांची अॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तर साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांना श्रीरामपूर नगरपरिषदेतर्फे श्रीरामपूर भूषण पुरस्कार लाभल्याबद्दल गागरे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, श्रीरामपूर शहर हे विविध गुणशील,सेवाभावी माणसांच्या योगदानातून उभे राहिले आहे, २३ सप्टेंबर १९४७ रोजी स्थापन झालेल्या श्रीरामपूर नगरपरिषेदेच्या माध्यमातून या शहराने गेल्या ७५ वर्षात अनेकांना आपल्या प्रगतीच्या कुशीत सामावून घेतले आहे, त्यामुळे ही नगरी आधुनिक युगातील नवी,जाणकार, परिश्रमनिष्ठ आणि सर्वांना बरोबर घेऊन वाढणारी नगरी आहे.

त्यापैकीच प्राचार्य शेळके हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मु.खुंटेगाव पो. सेलू या छोट्या खेडयातील आहेत,रयत शिक्षण संस्थेतील दीर्घकाळ नोकरी यानिमित्ताने या शहराशी ते योगदानाच्या जाणिवेने एकरूप झाले, डॉ.बाबुराव उपाध्ये हे मूळ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील भारम कोळम येथील पण पोरक्या अवस्थेत त्यांची खूप भ्रमंती झाली,त्यांच्या जन्म कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव येथे झाला तर प्राथमिक शिक्षण उंदीरगावी झाले,त्यांना वडील आठवत नाहीत आणि त्यांची आई त्यांना त्यांच्या बालपणीच उंदीरगाव या मामाच्या गावी सोडून गेली, अनेकांच्या घरची धुणी,भांडी करून ते शिकले,हॉटेल बॉय म्हणून ते १९६६-६७ पासून श्रीरामपूर शहराशी एकरूप झाले,शिकले. प्राचार्य शेळके आणि डॉ. उपाध्ये यांचा जीवन संघर्ष दिशादर्शक आहे, त्यामुळे या दोघांचा सन्मान करण्यात आम्हाला आनंद वाटतो, त्यांनी शून्यातून केलेली उभारणी हे आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे सांगून अशीच माणसं घडविणारी असतात म्हणून गागरे परिवाराला सत्कार करण्यात समाधान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.प्राचार्य शेळके आणि डॉ. उपाध्ये यांनी आपली वाटचाल सांगून हे शहर अनेकांच्या योगदानातून उभे राहिले आहे, येथे आपणास मायेची उब आणि माणुसकीची साथ मिळाली असे सांगितले, गागरे परिवाराने दखल घेतली, सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.सागर राजभोज यांनी नियोजनात भाग घेतला तर सौ.नंदाताई गागरे यांनी आभार मानले.

टीम झुंजार