प्रा.डॉ.एन.डी.पाटील पुरोगामी
विचारांचे सच्चे जाणते व्यक्तिमत्व

Spread the love

महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची भूमी आहे.छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे कितीतरी महामानवांनी महाराष्ट्रभूमीला विवेकावाहिनी बनविले, अशा विचारला आयुष्यभर समर्पित केलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रा, डॉ.एन.डी. पाटील होय.
सोमवार दि.१७ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, ही महाराष्ट्राची मोठी वैचारिक संघर्षशील अशा चळवळीची हानीच आहे,त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ आणि आत्मीयता प्रकट झाली.त्यांचे जीवनचरित्र म्हणजे एक महाभारत आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांची जवळून झालेली ओळख मनीमानसी मुरलेली आहे.
डॉ.एन.डी.पाटील म्हणजेच नारायण ज्ञानदेव पाटील
यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी ढवळी (नागांव), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे शिक्षण एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.(१९६२) पुणे विद्यापीठ येथे झाले.
प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी
१९५४ ते १९५७ या काळात छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून प्रभावी कार्य केले.
१९६० साली त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून ठसा निर्माण केला. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सेवाभावी वृत्तीचे होते.त्यांनी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२) कार्य केले. ते
शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य (१९६५) होते.
शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य (१९६२ ते १९७८)
शिवाजी विद्यापीठ सामाजिक शास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८),सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१), रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन १९९० पासून,
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बेळगाव अध्यक्ष १९८५ पासून, त्यांनी अशा विविध संस्थेवर केलेले कार्य गौरवोस्पद आहे.त्यांचे राजकीय कार्य प्रभावी आहे. त्यांनी १९४८ ला शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
१९५७ साली मुंबई गिरणी कामगार संघटनेचे ते सरचिटणीस होते, १९६०-६६,१९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. १९६९- १९७८, १९८५- २०१० – शे.का.प.चे ते सरचिटणीस होते.१९७८-१९८० या काळात ते सहकारमंत्री होते.त्यांनी १९८५-१९९० या काळात महाराष्ट्र विधानसभा सदस्य,कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
१९९९-२००२ या काळात ते निमंत्रक म्हणून लोकशाही आघाडी सरकारमध्ये
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य होते, सीमा चळवळीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी दीर्घकाळ लढा दिला.
प्रा.डॉ. एन.डी. पाटील यांना अनेक सन्मान / पुरस्कार प्राप्त झाले,
काही सन्मान –
*भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद) भारत सरकार – १९९८–२०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार अशी यादी सांगता येईल.

*भूषविलेली पदेही तितकीच भूषणावह ठरली.

ते रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य होते,
समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य म्हणून त्यांनी प्रेरणादायी छाप निर्माण केली.
त्यांचे प्रसिद्ध झालेले काही लेखनही त्यांच्यातील लेखक प्रभावी असल्याची प्रचिती देणारा आहे,
*समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका),
*शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२,
*कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२,
*शेतीमालाला किफायतशीर किंमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३,
*वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६,
*महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७,
*शेतीमालाच्या किफायतशीर किंमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०,
*शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२,
*महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका ),
*नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१, *नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, अशी उदाहरणे सांगता येतील.
प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत केलेले विशेष कार्य प्रेरणादायी आहे,

चेअरमन पद काळात त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा, साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर दिला,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांना गती दिली.या उपक्रमाची वेगाने केलेली जडणघडण महत्वाची आहे, तसेच दुर्बल शाखा विकास निधी,महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे अध्यासन केंद्रे आदींची केलेली स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची केलेली निर्मिती महत्वाची आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच प्राध्यापक प्रबोधन कार्याला दिलेली चालना अशा अनेक नोंदी डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्य, विचारांची प्रचिती देतात, त्यांच्या पुरोगामी विचारांची प्रेरणा आजच्या पिढीला दिशादर्शक आहे, त्यांच्या कार्यस्मृतीला हे शब्दनमन आहे.
=डॉ. बाबुराव उपाध्ये,श्रीरामपूर 9270087640

टीम झुंजार