मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी पोलिसांची मोठी कारवाई ; समोरुन पाहिलं तर शिवसेना संपर्क कार्यालय अन् मागे सट्ट्याचा अड्डा.

Spread the love

जळगावमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बॅनरमागेच सुरू होता जुगाराचा अड्डा

जळगाव :- शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावलेल्या मागील बाजूस जुगाराचा अड्डा सुरू असल्याचं उघड झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे समोर बॅनर लावलेले शिवसेना संपर्क (Shivsena Office) कार्यालयाच्या मागील बाजूस सट्ट्याचा अड्डा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सट्ट्याच्या अड्ड्यावर अगोदर शिंदे गटाच्या शोभा चौधरी यांनी धाड घातली. त्या नंतर पोलिसांनी कारवाई केली असल्याच पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव दौरा आहे. या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या बॅनरच्या आड सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्डयावर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उघड केलेला हा प्रकार आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याठिकाणी सट्टा सुरु असल्याची माहिती शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकारी आणि सध्या शिंदे गटात असलेल्या शोभा चौधरी पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. हा सट्ट्याच्या अड्डा उद्धव ठाकरे समर्थक एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असल्याचा आरोप शोभा चौधरी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन आता जळगावात उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे.

शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना ते राहत असलेल्या परिसरात एका ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर समोर लावलेले कार्यालय आणि त्याच्या समोर लोकांची गर्दी असल्याचे दिसून आले. शोभा चौधरी या बाहेरून घरी जात असताना त्यांच्या सोबतच्या तरुणीसोबत एका तरुणाने शिट्टी मारून छेड काढली. यावेळी शोभा चौधरी यांनी सेनेच्या कार्यालयात जाऊन खात्री केली असता याठिकाणी सट्ट्याचा खेळ सुरु असल्याचे दिसून आले, अशी माहिती शोभा चौधरी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत याठिकाणी सट्टा खेळणारे आणि खेळविणारे दोन्ही पसार झाले होते. किमान 40 ते 50 असल्याची माहिती शिवसेना महिला पदाधिकारी शोभा चौधरी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावून त्यामागे जर सट्टा खेळविला जात असल्याने हा बाळासाहेबांना मोठा अपमान असल्याचंही शोभा चौधरी यांनी म्हटलं आहे.

रामेश्वर कॉलनीतील या सट्ट्याच्या अडडयावर पोलिसांनी कारवाई केली असून अनिल लक्ष्मण माळी याच्यासह सट्टा पेढीमालक जावेद शेख सलीम या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शोभा चौधरी या शिवसेनेत असतांनाही हा सट्ट्यायचा अड्डा सुरु होता. मात्र त्त्यावेळी त्यांना तो दिसला नाही का, आता ते शिंदे गटात गेल्यामुळे त्यांनी याबाबत तक्रार केली असल्याचेही बोलले जात आहेत. भविष्यात हा वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार