‘माझी गणती येरा गबाळ्यात करू नका’; गुलाबरावांना अब्दुल सत्तारांचा टोला

Spread the love

जळगाव : – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीने आयोजित केलेल्या खान्देशस्तरीय कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. मात्र पाटील यांना नियोजन समितीच्या आढावा बैठकीला जायचे असल्याने त्यांनी कार्यक्रमातून जायचे होते. त्यांनी भाषणात तसे सांगितले देखील. त्यावर सत्तार यांनी म्हटले की, गुलाबराव पाटील यांनी माझ्यासाठीही एखादा तास ठेवला असता तर बरे वाटले असते. इथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे, माझी गणती येरा गबाळ्यात करू नका, असा टोलाही गुलाबराव पाटील यांना लगावला.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील हे उठले आणि नियोजन समितीच्या बैठकीला निघून गेले.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले की, सीएमव्हीबाबत शासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यानंतर नुकसान भरपाई कशी द्यावी, त्यावर विचार केला जाईल. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना सक्षम करण्यासाठी पोकरा योजनेचा लाभ दिला गेला आहे. त्यासाठी शासनाने बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यात २५०० कोटींचा खर्च झाला आहे. पुढे १५०० कोटी शिल्लक आहेत. ही योजना वाढवण्यासंदर्भात शासनस्तरावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. पुढील अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला झुकते माप दिले जाणार आहे. शासनाने जुलैमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई ही साडेचार हजार कोटींची सप्टेंबरमध्येच भरपाई दिली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या दिवाळी किटमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की, आधी लोकांकडे हे दिवाळी किट पोहोचू द्यावे. हा व्यवहारच झालेला नाही तर गैरव्यवहार कसा होणार. विरोधी पक्षनेत्यांनी टीका करताना विचार करुन करावा, असेही ते म्हणाले. दसरा मेळाव्यात सिल्लोडमधून गेलेल्या वाहनांच्या संख्येबाबत म्हणाले की, सर्व नेत्यांच्या गाड्या गेल्या होत्या. त्यात माझाही खारीचा वाटा होता. त्यात फार काही नव्हते.’

हे वाचलंत का ?

टीम झुंजार