धक्कादायक : तीने धमकी दिली, त्याने इमारतीवरुन उडी मारली! पुण्यात Sextortion चा दोन दिवसातील दुसरा बळी

Spread the love

पुणे : – समाजमाध्यमाद्वारे मैत्री करून अश्लील फोटो आणि ‘व्हिडिओ’ची भीती दाखवून खंडणीसाठी धमकावण्याच्या प्रकारात चारपटींनी वाढ झाली आहे. अश्यातच सेक्सटॉर्शन (sextortion) प्रकरणातून मुलानं आत्महत्या केल्याची सलग दुसरी घटना पुण्यात घडली आहे. शंतनु वाडकर हा 19 वर्षांचा मुलगा सेक्ससेक्सटॉर्शनचा बळी ठरला आहे. शंतनुची प्रिया यादव नावाच्या मुलीशी इंस्टाग्राम (Instagram) वरून ओळख झाली होती. ती त्याला त्याचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत होती. त्यातून तीने त्याच्याकडून साडेचार हजार रुपये उकळले होते. पण आणखी पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र शंतनूकडे पैसे नव्हते. त्यामुळे बदनामीच्या भीतीने तो घाबरून गेला होता.

अशा परिस्थितीत त्यांन तो राहत असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 28 सप्टेंबरला ही घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्याबाबत घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती

सेक्सटॉर्शनच्या प्रकारात वाढ :

समाजमाध्यमाद्वारे मैत्री करून अश्लील फोटो आणि ‘व्हिडिओ’ची भीती दाखवून खंडणीसाठी धमकावण्याच्या प्रकारात चारपटींनी वाढ झाली आहे. सायबर पोलिसांकडे या वर्षांत सप्टेंबरअखेरपर्यंत ‘सेस्कटॉर्शन’च्या एक हजार 445 तक्रारी आल्या आहेत, मागील वर्षी अशा 485 तक्रारी आल्या होत्या. विशेष म्हणजे 2020 मध्ये या प्रकाराची एकही तक्रार दाखल नव्हती. तक्रारदारांची संख्या वाढत असली तरी बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल न करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

बदनामीची भीती :

सायबर पोलिसांकडे मागील वर्षी 485 तक्रारी आल्या तर, केवळ चार गुन्हे दाखल झाले. या वर्षांत सुमारे दीड हजार तक्रारी प्राप्त झालेल्या असताना अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील वर्षीच्या 65 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. या प्रकारांना आळा घालायचा असेल तर बदनामीच्या भीतीने तक्रार नको, अशी मानसिकता बाळगण्याऐवजी पीडित लोकांनी तक्रार दाखल करण्यासाठी त्वरित पुढे आले पाहिजे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

समाजमाध्यमाचा कुरुप चेहरा :

समाजमाध्यमात मैत्री झालेल्या अनोळखी तरुणीने नग्न व्हिडिओ प्रसारित करण्याची सतत धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियाचा कुरुप चेहरा समोर आला असून, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.

अनोळखी रिक्वेस्ट टाळा :

अश्लील फोटो आणि ‘व्हिडिओ’ची भीती दाखवून खंडणीची धमकी देण्याचे प्रकार वाढल्याने अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टपासून सावध राहा, असा सल्ला सायबर पोलिस आणि सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय ?

हा प्रकार सध्या खूप वाढला आहे. एखाद्या सुंदर मुलीकडून फेसबुक रिक्वेस्ट पाठवली जाते. ती स्विकारल्यावर लगेच तिच्याकडून मेसेज येतात आणि व्हिडिओ कॉल करण्याची मागणी होते. व्हॉट्सअप नंबरही घेतला जातो. त्यानंतर व्हिडिओ कॉल येतो. त्यावेळी ती मुलगी नग्न असते. तरूणही याला मोहून व्हिडिओ कॉलवर बोलतात. पण त्यानंतर मुलीकडून हा कॉल रेकॉर्ड केला जातो आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे वसूल करण्यात येतात. त्यामुळे या प्रकारापासून सावध राहणे गरजेचे आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार