मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छगन भुजबळ यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा व भुजबळांचा अमृतमहोत्सव हा योगायोग म्हणावा लागेल. कोणी तीन वर्षांपुर्वी सांगितले असते या सोहळ्याला मी उपस्थित राहिल तर कोणाचा विश्वास बसला नसता. पण नियतीच्या मनात हेच होतं. आज प्रत्येकाच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. भुजबळ शिवसेनेत असताना मशाल चिन्हावर निवडून आले. अजीत पवार यांनी सांगितले की भुजबळ सरकार वाचविण्यात वाकबगार आहे. हे तेव्हाच सांगायचे होते. कामाला लावले असते असे म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. ठाकरे म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. यातून सावरायला मोठा वेळ लागला. पण नंतर बरं झालं तुम्ही मातोश्रीवर येऊन हे मतभेद मिटवले. फक्त हे पहायला मा हव्या होत्या. भुजबळ हे वयाने तरुण आहेत. सेनेमध्ये असताना कधी त्यांनी दुरुपयोग केला नाही. त्यांनी जिद्दिने वाटचाल केली. अडीच वर्षांपुर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग देशाने पाहिला. तुमचे मार्गदर्शन लाभले. पण सध्या वैचारीक उंची पहायला मिळत नाही. वैचारीक एफएसआय जादा असायला हवा. भुजबळ हे न डगमगणारे व जिद्दिने उभे राहणारे वादळ आहे. आणखी लढाई लढायची आहे. पुढील काळात देखील साथ सोबत राहू द्या. तुम्ही तुमची ७५ वर्ष पूर्ण केली. आता पुढच्या ७५ वर्षांनी पुन्हा बोलवा असे सांगत त्यांनी दीर्घायुष्यासाठी भुजबळांना शुभेच्छा दिल्या.
भुजबळ लढाऊवृत्ती असेलेलं संकटांना न डगमगणारं नेतृत्व – अजित पवार छगन भुजबळ यांचा मी चाहता असून नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा असा छगन भुजबळ यांचा परिचय आहे. १९८६ मध्ये भुजबळ साहेब दुबईचा व्यापारी इकबाल शेखच्या वेशात बेळगाव मध्ये घुसले होते. त्याबद्दल त्यांना अटक देखील झाली नंतर त्यांना जेल देखील झाली. मराठी माणसाचा आवाज सीमा भागामध्ये कमी होणार नाही यासाठी ते काम करत राहिले. आज देखील काही पक्ष संघटना ओबीसी बांधवांच्या करता खोटे गळे काढत आहेत. परंतु ते मगरीच्या अश्रू आहेत. देशात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळेस राज्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय ठोस भूमिका घेण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं. राज्यात आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नाशिकमध्ये त्यांनी केलेला विकास, केलेल्या सुधारणा या अतिशय उत्कृष्ट आहे. छगन भुजबळ हे लढाऊ, संकटांना न डगमगणारे, संकटांवर मात करणारे नेतृत्व आहे. ते म्हणाले की, एखाद्या गोष्टीत लक्ष घालून जीव ओतून काम करणे हा छगन भुजबळ यांचा स्वभाव आहे. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द आणि जीवन धोक्यात टाकण्याची जोखीम त्यांनी पत्करलेली होती. याची नोंद या निमित्ताने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. १० जून १९९९ ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर खरंतर लगेच निवडणुका झाल्या. सहा महिने आधी निवडणुका घेतल्या. भुजबळ साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर आघाडीची सत्ता आली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड काम करून दाखवलं. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्र सदन उभारलं. हे देशातील अतिशय उत्कृष्ट सदन आहे. यासाठी एकही पैसा दिला नसतांना नाहक बदनामी करण्यात आली. देशात एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचे घाणेरडे राजकारण काही जण करतात. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ हे वादळ, देशात पुन्हा एकदा मशाल पेटविण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल – माजी मंत्री बाळासाहेब थोरात :- भुजबळ यांना विधानभवनात १९८५ साली पाहण्याचा योग आला. त्यांची सभागृहात एंट्री वादळी होती. त्यांनी विविध प्रश्नावर सभागृह गाजवत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यावेळी सभागृहात राम नाईक, दत्ता पाटिल, मृणाल गोरे असे अनेक तरुण आक्रमक चेहरे होते. पण भुजबळ त्यात वेगळे होते. १९९२ ला ते कॉंग्रेसमधे आले. १९९५ ला ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी भुजबळ नावाचं वादळ पहायला मिळालं. सरकारला धारेवर धरणारे भुजबळ सर्वत्र गाजले. १९९९ ला दोन्ही कॉंग्रेगसची सत्ता येण्यास जे प्रमुख वक्ते होते. त्यात भुजबळ हे अग्रभागी होते. सत्ता येण्यास वरचा क्रमांक भुजबळांचा होता. त्यावेळेस दोन्ही कॉंग्रेसची आघाडी व्हावी यासाठी त्यांचा मोठा वाटा होता असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही नेते पुरोगामी होते. पण प्रत्यक्ष राजकारणात हे विचार त्यांना पुढे नेत वाटचाल करणे जमले नाही. म्हणून ते संपले. पण भुजबळांनी पुरोगामी विचार राजकारणात प्रॅक्टिकली अंमलात आणत वाटचाल केली. या दोन्ही बाबींचा त्यांनी सुंदर मिलाफ घातला. २००३ मध्ये आघाडी सरकार टिकवण्यात भुजबळांचा मोठा वाटा होता. समीर भुजबळ यांचीही साथ मिळाली. विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे सरकार भुजबळांमुळे टिकले असे सांगायचे. आता देशात लोकशाही व संविधान धोक्यात आहे. पुन्हा एकदा मशाल पेटवण्याचे काम भुजबळांना करायचे आहे. मशाल पेटवायला हात आहे व हातावर घड्याळ आहे, असे सांगत देश वाचवायचे काम पुन्हा तुम्हांला करायचे असे आवाहन केले.
छगन भुजबळ केवळ ओबीसी नव्हे तर दिनदलित वंचितांच्या हितासाठी लढणारे संघर्ष योद्धा – खा. प्रफुल्ल पटेल महाराष्ट्रासह देशातील दिनदलित वंचित व उपेक्षितांचे नेते व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे छगन भुजबळ हे संघर्ष योध्दा आहेत. केवळ ओबीसींच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी लढणारा योध्दा अशी भुजबळांची ओळख आहे. त्यांच्या ६१ चा सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ्या जनसमुदायासमोर झाला होता. आज छगन भुजबळांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलो आहेत पुढे आपण त्यांची शंभरही साजरी करु असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, छगन भुजबळ शिवसेनेत असतांना १९८५ साली मशाल चिन्हावर पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचवर्षी नगरसेवक व मुंबईचे महापौर निवडले गेले होते. भुजबळांचा राजकीय प्रवास अतिशय मोठा आहे. त्यांचा शतकमहोत्सवी कार्यक्रम देखील आपण साजरा करु, त्यावेळी देखील मीच समन्वयक राहिल, असे सांगत त्यांनी छगन भुजबळांना ७५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार कपिल पाटील व आभार प्रदर्शन आमदार सचिन आहिर यांनी केले.