धक्कादायक : पत्नीचा गळा चिरून खून करून पतीची आत्महत्या; दोन चिमुकली मुले झाली पोरकी

Spread the love

तुमसर (भंडारा) : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सरिता सुरेश बोरकर (३७) असे पत्नीचे तर सुशील नीलकंठ बोरकर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. दोघेही गोबरवाही रोडवरील सीतासावंगी येथे राहायचे. सुशीलचा अंडी विक्रीचा व्यवसाय आहे. सरिता आशा सेविका म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होती. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. याच आर्थिक तंगीतून त्याने हे कठोर पाऊल उचलल्याचे कळते.

गुरुवारी रात्री सुशील, सरिता व त्यांची दोन्ही मुले झोपी गेली. मुले एका खोलीत तर दोघेही पती- पत्नी दुसऱ्या खोलीत होते. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास मुलांची शाळेत परीक्षा असल्याने दोघेही लवकरच जागे झाले. मात्र, आई- वडील जागे झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी आवाज दिला. मात्र, बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलांनी शेजारी राहणारे मोठे वडील अनिल बोरकर यांना बोलाविले. अनिलनेही आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घराच्या मागचा दरवाजा तोडला. तेव्हा खोलीतील दृश्य अत्यंत थरारक होते.

पती – पत्नी रक्ताच्या थाराेळ्यात

खाेलीचे दार ताेडताच आतमध्ये पती- पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सरिता बिछान्यावर तर सुशील खाली गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला. या प्रकाराची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आतून दार बंद असल्याने बाहेरून कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती. तसेच खोलीत एक ब्लेड आढळून आला. त्यामुळे पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून सुशिलनेही त्याच ब्लेडने आपला गळा चिरून आत्महत्या केल्याचा संशय आहे. तसचे सुशीलचे ब्लेडने बोट चिरलेले आढळून आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास ठाणेदार दीपक पाटील करीत आहेत.

हे वाचलंत का. ?

टीम झुंजार