जळगाव-भुसावळ बसची कंटेनरला मागुन धडक ; 38 प्रवासी जखमी,चालक म्हणतो, ‘मला उमजलेच नाही..!’

Spread the love

जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा चौकाच्या अलीकडेच ममता हॉस्पिटलसमोर पुढे चालणारा कंटेरनर गतिरोधकावर हळू होताच मागून महामंडळाची सुसाट बस कंटेनरवर धडकली. या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून, दोघांना गंभीर दुखापत झाली आहे

जळगाव आगारातून साडेअकराच्या सुमारास जळगाव-भुसावळ बस (एमएच २०, बीएल ९४७) घेऊन चालक देवेंद्र पाटील (वय ४५) भुसावळच्या दिशेने निघाले. बसमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरी-व्यवसायाला निघालेल्या प्रवाशांनी बस खच्चून भरली होती. स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी, इच्छादेवीमार्गे भुसावळच्या दिशेने जात असताना अजिंठा चौकाच्या अलीकडेच ममता हॉस्पिटलसमोरच महामार्गावरील गतिरोधकावर पुढे चालत असलेल्या कंटेनरचालकाने अचानक ब्रेक लावला. दोन्ही वाहनांत कमी अंतर असल्याने वेगवान बस मागून कंटेनरवर धडकली.

अपघातामुळे बसमधून आरडाओरडा, किंचाळ्यांचा आवाज येऊ लागल्याने परिसरातील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गोविंदा पाटील, किशोर पाटील यांनी घटनास्थळ गाठले. जखमींना खाली उतरवत असताना महामार्गावर दोन्ही बाजूला तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.निरीक्षक प्रतापसिंह शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान अली सय्यद, सचिन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाल्यावर अपघातग्रस्त बस बाजूला करून जखमींना मिळेल त्या वाहनाने जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. काही किरकोळ जखमी प्रवाशांनी न थांबता पर्यायी वाहनाने पुढचा मार्ग निवडला. चालक देवेंद्र पाटील, महिला वाहक भारती रवींद्र इंगळे यांच्यासह तब्बल ३८ प्रवासी जखमी झाले.

चालक म्हणतो, ‘मला उमजलेच नाही..!’

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, संबंधित एसटी विभागातील अधिकारी जखमींची भेट घेण्यासाठी जिल्‍हा रुग्णालयात आले. या वेळी अपघात नेमका कशामुळे घडला हे अपघातग्रस्त बसचालक देवेंद्र पाटील यांना सांगताच आले नाही. त्याच्या डोक्याला, हाताला, कंबरेत जबर दुखापत झाली असून, बसचे स्टेअरिंग पोटात घुसले होते. परिसरातील गॅरेजचालकांनी स्टेअरिंग मोकळे करत जखमी चालकाला बाहेर काढले. त्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत कण्यात आली.

जखमींची नावे अशी :

विजया उत्तम सुरवाडे (वय ४०, रा. नशिराबाद), रघुनाथ झुलाल पाटील (७०, चोपडा), लटकू विठ्ठल पाटील (६८, रा. पाचोरा), चंद्रसिंग बाबूलाल पाटील (३६), यामिनी पाटील (१६), योगिनी पाटील (१७), आरती माळी (१६), शुभांगी नेमाडे (१७), दीपाली अनिल माळी (१७), हेमांगी सुभाष माळी (१७), शुभांगी भावसार (१८), शुभदा भावसार (१७), रोहन कैलास सोनवणे (२०), रतन सोनवणे (३५, कवठळ), सर्फराज शहा रज्जाक शहा (५७, रा. नशिराबाद), अमित चौधरी (१६), जयेश अनिल झुंझारवाल ( २५, जळगाव), विजय रमेश इंगळे (२०), नरेंद्र दिवाणसिंग पाटील (४५), पूजा मधुकर महाजन (२०), नूतन पाटील (१७), रत्नदीपबोदडे (२०), रेणुका संदीप भंगाळे (१९), नूतन पाटील (१६), भावना फेगडे (१६), बारकू विठ्ठल राजपूत(६५), युसूफअली (६५, सर्व रा. नशिराबाद), साक्षी राजेश गुंजाळ (१७, रा. भुसावळ), भारती रवींद्र इंगळे (४५, रा. नशिराबाद), धनश्री हरीश सैंदाणे (२१, रा. भुसावळ) यांच्याव्यतिरिक्त दोन गंभीर जखमी आणि इतर आठ प्रवासी खासगी दवाखान्यात रवाना झाले. रात्री उशिरा या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार