खतांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी
बेलापुर (प्रतिनिधी )- निसार्गाच्या ऋतुमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच शासनाने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांना जोरदार धक्का दिला असुन वाढलेल्या खतांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे,वातावरणात वेळोवेळी बदल होत असतानाही आपला जिव मुठीत धरुन शेतकऱ्यांनी कांदा,गहु हरबरा,ज्वारी पिके घेतली. अनेकांनी फळबागा धरलेल्या आहेत, वातावरणात झालेल्या बदलामुळे फवारणी करुन वैतागलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक जोरदार झटका दिला असुन रासायनिक खतांच्या किमतीत ५० रुपयापासुन १९५ रुपयापर्यत वाढ केलेली आहे, आगोदरच वाढता उत्पादन खर्च व कमी उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झालेली असतानाच खताच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती करावी तर कशी करावी ? असा प्रश्न शेताकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे,रब्बी हंगामातील खतांची मागणी वाढलेली असतानाच शासनाने खतांच्या किमतीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे.
२४;२४;० ची खताची गोणी १५४० रुपयांना मिळत होती आज तीची किंमत १७०० रुपये झाली आहे.१०;२६;२६ ची गोणी पुर्वी १४५० रुपयांना मिळत होती, आता तीच गोणी १६४० रुपयांना मिळणार आहे .१२;३२;१६ ही खताची गोणी १४७० रुपयांना मिळत होती,आता तीची किंमत १६४० रुपये झाली आहे, पोटँशची किमंत पुर्वी १०१५ रुपये होती आता तीच किमत १८७५ रुपये झाली आहे, १६;२०;०;१३ या खताच्या गोणीतही ५० रुपयांनी वाढ झाली आहे,त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा मेटाकुटीस आला आहे, शासनाने खतांच्या किमती तातडीने कमी कराव्यात अशी त्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे .