“आदित्य ठाकरे गोधडीत होते, तेव्हापासून…”, ‘पप्पू’ असा उल्लेख करत अब्दुल सत्तारांची खोचक टीका!

Spread the love

मुंबई :- फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. दरम्यान, माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. उद्योगांचा राज्यातील खोके सरकारवर विश्वास नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

या टीकेला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला आहे. “उद्योगांचा खोके सरकारवर विश्वास नाही” या आदित्य ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता सत्तार म्हणाले, पप्पू जे बोलतात ते सगळं खरं असतं का? हे पप्पू क्रमांक दोन आहेत. खोके कुणी घेतले? कसे घेतले? किती घेतले? कुठे घेतले? याचा हिशोबही त्यांनी द्यायला पाहिजे. सध्या मी पप्पूबद्दल फार बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आदित्य ठाकरेंचं नाव न घेता सत्तार पुढे म्हणाले, “ते गोधडीत होते, तेव्हापासून आम्ही राजकारण करतोय. माझं वय ६२ वर्षे आहे. सध्या राज्यात सामान्य माणसांच्या भावना जाणून घेणारं सरकार आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता वाढत आहे. सरकारची लोकप्रियता मलिन व्हावी. त्यासाठी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असे लोक कायदा आणि सुव्यवस्था भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीकाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार