औरंगाबाद : – सध्या महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातून घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच प्रेमविवाहानंतर परस्परांविषयी संशय व अन्य कारणांमुळे विभक्त झाल्यावरही पती पुन्हा एकत्र राहण्यासाठी मागे लागल्याने एका विवाहितेने त्याचा कायमचा काटा काढल्याची खळबळजनक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. पती खूपच मागे लागल्यावर ती त्याच्यासोबत बाहेर जायला तयार झाली आणि तिकडेच त्याला मनसोक्त दारू पाजत तिने पोटात चाकू खुपसून त्याला कायमचा संपवल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह लपविण्यासाठी तिने फेसबुकवर सूत जुळलेल्या प्रियकराची मदत घेतल्याचेही समोर आले आहे.
विजय संजयकुमार पाटणी (३५, रा. एन-६, सिडको) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या खूनप्रकरणी त्याची विभक्त राहणारी पत्नी सारिका विजय पाटणी (३०, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (२५, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा आणि सातारा पोलिसांनी शनिवारी ९० पेक्षा अधिक बेपत्ता तक्रारींचे विश्लेषण करत ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुटुंबासह एन-११ मध्ये राहत होते. त्यांचा डिजिटल बिझनेस कार्ड व मिनी वेबसाइट नावाने व्यवसाय होता. एप्रिल २०१० मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. मात्र, त्यांच्यात संशय व नोकरीवरून मतभेद झाले. परिणामी, दोघांनी एकत्र घेतलेल्या निर्णयानुसार सारिका चार महिन्यांपूर्वी वेगळे राहण्यास गेली. पदवीचे शिक्षण घेतलेल्या सारिकाने टॅली करून वाळूजमध्ये नोकरी मिळवून मुलीसोबत राहत होती. सततचा पाठलाग टाळण्यासाठी तिने विजय यांना कुवेतला जात असल्याचे सांगितले होते.
विभक्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी सारिकाची फेसबुकवर सागरसोबत मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. याबाबत विजयला कळल्यानंतर तो सारिकाला सतत त्रास देऊ लागला. तसेच पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट करू लागला. अनेकदा तो दारू पिऊन सारिकाच्या घरी जाऊन त्रास देत होता. या सर्व त्रासाला सारिका कंटाळली होती.
दोन ऑक्टोबर रोजी वाढदिवस झाल्यानंतर विजय सातत्याने तिला भेटण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचा तिला त्रास होत होता. सतत मागे लागल्यामुळे अखेर सारिकाने १८ ऑक्टोबर रोजी विजयसोबत पैठणला जाण्याचे ठरवले. तेथे सारिकाने विजयला मनसोक्त दारू पाजली. परत निघाल्यावर दोघे नवीन धुळे-सोलापूर हायवेवर वाल्मीजवळील उड्डाणपुलाजवळ पोहोचले. ठरल्याप्रमाणे सारिकाने विजयच्या डोळ्यात स्प्रे मारला. तो गड्बडताच तिने चाकूने त्याच्या पोटात सपासप वार केले. यामळे विजय रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. त्यानंतर सागरला बोलावून घेतले. मात्र, त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिला. यावर तिने सागरवर दबाव टाकला. त्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. अखेर सागरने विजयचा मृतदेह खड्ड्यात ढकलून दिला. यानंतर दोघेही तेथून निघून गेले.
चार दिवसांनी २२ ऑक्टोबरला सारिकाने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आम्ही १८ ऑक्टोबर रोजी पैठण, पडेगाव येथे फिरायला गेलो होतो. तेथून आल्यावर मला रात्री १० वाजता घरी सोडून गेल्यानंतर पती बेपत्ता झाल्याचे तिने फिर्यादीत म्हटले होते. विशेष म्हणजे, थंड डोक्याने खून केल्यानंतर सारिकाने सासूची भेट घेतली. एवढेच नाही तर विजय लवकर परत येतील, असा आधारही दिला.
मृतदेह सापडला अन सारिका अडकत गेली! दरम्यानच्या काळात गेल्या शुक्रवारी अनोळखी मृतदेह वाल्मी परिसरात आढळला. शवविच्छेदनात संबधित व्यक्तीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के, साताऱ्याचे सर्जेराव सानप, नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर देतानाच शहरातील सर्व ठाण्यांमधील बेपत्ता तक्रारींचे विश्लेषण सुरू केले. सुमारे ९० बेपत्ता लोकांच्या तक्रारींचे विश्लेषण केल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी एका बेपत्ता तक्रारीत संबंधितांच्या हातावर ओम असल्याचा उल्लेख समोर आला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला.
फिर्यादी सारिकाच निघाली आरोपी :
या प्रकरणात सारिका पत्नी हेने पती विजय बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तिचे घर गाठून चौकशी केली. तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, उत्तर देताना ती अडखळायला लागताच संशय बळावला. त्यानंतर तांत्रिक तपासात तिला प्रियकर असल्याचे स्पष्ट झाले व पोलिसांनी रविवारी सागरला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. विजय यांची आई वृद्ध असून वडिलांना अर्धांगवायू झाला आहे. त्यांना रविवारपर्यंत मुलाच्या खुनाची कल्पना नव्हती. सहायक फौजदार सतीश जाधव, शेख हबीब, सुधाकर मिसाळ, संजय मुळे, राजेंद्र साळुंके, नवनाथ खांडेकर यांच्या पथकाने कारवाई केली.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४