मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या गट २ च्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेवर १३ धावांनी विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आशा संपवल्या. सुपर १२ मध्ये आधीच्या सामन्यात झिंम्बाब्वे आणि आज दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत त्यांनी आपली छाप स्पर्धेवर सोडली. अाज पुन्हा सिद्ध झाले दक्षिण आफ्रिका विश्वचषका सारख्या मोठ्या स्पर्धा जिंकू शकत नाहीत.
नेदरलँड्सने ४ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँड्ससाठी कॉलिन अकरमनने २६ चेंडूत नाबाद ४१, स्टिफन मायबुर्गने ३० चेंडूत नाबाद ३७, टॉम कूपरने १९ चेंडूत ३५ तर मॅक्स ओडाऊडने ३१ चेंडूंत २९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने (२/२७) बळी घेतले. लक्ष्याचा बचाव करताना नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी प्रसंगावधान राखले आणि ब्रँडन ग्लोव्हरच्या (३/९) जोरावर दक्षिण आफ्रिकेला ८ बाद १४५ धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेकडून रिली रोसोने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. कॉलिन अकरमनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.