मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या गट २ च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवला आणि राजेशाही थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावल्यामुळे भारताने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ५ बाद १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा डाव १७.२ षटकांत ११५ धावांत आटोपला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर वेस्टली माधवेरेला शून्यावर बाद केल्याने भारताला चांगली सुरुवात करून दिली.
त्यानंतर अर्शदीप सिंगने रेगिस चकाब्वाला बाद करून भारताला आघाडीवर नेले. रविचंद्रन अश्विनने ४ षटकांत २२ धावांत ३ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली गोलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ९ नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे. पहिला उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबर (गुरुवार) रोजी अॅडलेड ओव्हलवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल.