अरे बापरे..तब्बल 7 वर्ष स्वत:चेच केस खाण्याची सवय, 13 व्या वर्षी पोटातून एक किलो केसांचा गोळा काढला

Spread the love

मुंबई :- तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा, ते काय खातात? यावर आपली नजर असली पाहिजे. कारण 13 वर्षाच्या मुलीच्या पोटातून चक्क केसांचा गोळा (hairball) बाहेर काढलेला आहे. हा केसांचा गोळा (hairball) तब्बल एक किलोचा आहे. ऐकून नवल वाटतं ना..! पण हे खरं आहे. वसईमध्ये (Vasai) हा प्रकार समोर आला आहे. येथील एका 13 वर्षाच्या मुलीच्या पोटातून (stomach) एक किलो वजनाचा केसांचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.

मुलीच्या पोटात केसांचा गोळा काही एका दिवसात तयार झाला नाही. मागील सात ते आठ वर्षात पोटामध्ये केसांचा गोळा तयार झालाय.  वसईमध्ये राहणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीला लहानपणापासून स्वतःचेच केस खायची सवय होती. मुलीची ही सवय घरात कुणाच्याच लक्षात आली नाही. आपल्याकडे कुणाचेही लक्ष नसले की मुलगी स्वतःचे केस उपटून खायची. सात ते आठ वर्षांपासून ती केसं खात होती, हे केस पोटामध्येच जमा झाले.  आणि त्याचा पोटामध्ये एकाजागी भलामोठा गोळा तयार झाला. कालांतराने या केसांचा त्या मुलीला त्रास व्हायला सुरुवात झाली.  काहीही खाल्लं की तिला लगेच उलटी व्हायची,  तिला भूक देखील लागत नव्हती. तिचं पोट देखील बर्‍यापैकी फुगलं होतं. कुटुंबियांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.  डॉक्टरांनी त्या मुलीवर तात्काळ उपचार सुरु केले. सर्वप्रथम डॉक्टरांनी तिच्या पोटाची सोनोग्राफी केली आणि त्याच वेळी पोटामध्ये गोळा असल्याचं डॉक्टरांना समजलं. एक किलोचा गोळा बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला.  

वसईतल्या डिसोजा हॉस्पिटलमधील डॉ. जोसेफ डिसोजा या डॉक्टरांनी तब्बल एक तास ऑपरेशन केलं. त्यानंतर मुलीच्या पोटातून केसाचा गोळा बाहेर काढला. याला मेडीकलच्या भाषेत हेअरबॉल ट्यूमर असं म्हटलं जातं. हा गोळा पोटाच्या आकारा सारखाच होता.  हा केसाचा गोळा त्या मुलीच्या छोट्या आतडया पर्यंत गेला होता. याचं वजन एक किलो इतकं आहे.  तर लांबी 32 इंच,  रुंदी 13 इंच इतकी आहे. तर जगभरात अशा  याआधी 50 पेक्षा जास्त प्रकरणं झाली आहेत. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे. पण या प्रकरणानंतर वसईमध्ये चर्चेला उधाण आलं असून पाल्य आपत्याकडे बारकाईने लक्ष देऊ लागले आहेत. या विषयाची वसई आणि परिसरात चर्चा सुरु आहे.
 
दरम्यान, तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवायला हवं. लहान मुलांना जे मिळेल ते तोंडात घालण्याची सवय असते. कुणी खड्डू खातं, तर कुणाला नखं खायची सवय असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर नेहमी लक्ष ठेवणं गरजेच आहे. वेळीच मुलांच्या अशा सवयी मोडल्या पाहिजेत. तसेच त्यांची काऊन्सलिंग ही वेळीच केली पाहिजे, असं मत डॉक्टर जोसेफ डिसोजा यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार