दुचाकी चोर ‘जय-वीरू’ची जोडी एलसीबीच्या जाळ्यात, १५ दुचाकी हस्तगत

Spread the love

जळगाव :-सध्या महाराष्ट्रात दुचाकी चोरीला गेल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यात दररोज किमान ५ दुचाकी चोरी होत असून चोरट्यांना शोधण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. दोन दुचाकी चोरट्यांना पकडण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले. चोपडा तालुक्यात ‘जय-वीरू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जोडीकडून पथकाने १५ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हौस, मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरायची आणि सातपुडा परिसरात अवघ्या ५ ते ८ हजारात विक्री करण्याचा त्यांचा धंदा होता.

जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांनी एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना केल्या होत्या. निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना गुरुवारी अडावद येथील दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती.

एलसीबी निरीक्षकांनी कर्मचारी गोरखनाथ बागुल, संदिप रमेश पाटील, अश्रफ शेख, संदिप सावळे, प्रविण मांडोळे, परेश महाजन, रविंद्र पाटील, लोकेश माळी, भारत पाटील, प्रमोद ठाकूर अशांचे पथक तयार करून त्यांना अडावद ता.चोपडा येथे रवाना केले होते. पथकाने सापळा रचून दिपक संजय शेटे वय २० रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा व नविद शेख इजाज जय २३ रा. मनियार अळी, अडावद ता.चोपडा जि.जळगांव यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.

सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. दोघांनी चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि.खरगोन येथून मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांकडून चोपडा व शिरपूर पोलिसात दाखल १४ गुन्ह्यांमधील एकूण १५ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार