औरंगाबाद :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबाद जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस या छोट्याशा गावातून आलेला गजानन खुशाल मुंडे (३०) पीएचडी करत होता. विद्यापीठ वसतिगृहात राहायचा. गावातील सर्वात हुशार मुलगा. कुटुंबीयांनी पोटाला चिमटा देऊन शिकायला शहरात पाठवले. सहा महिन्यांपूर्वीच स्पोर्ट्स बाइक घेऊन घेऊन दिली. आपला मुलगा ‘डॉक्टर’ होऊन चांगली नोकरी करेल, घराण्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी स्वप्ने शेतकरी आई-वडील रंगवत होते.
मात्र, प्रेमाच्या आहारी गेल्याने टोकाचे पाऊल उचलत गजाननने स्वत:सह संशोधक मैत्रीण पूजा साळवे (२८, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) हिला पेटवून आयुष्याची राखरांगोळी केली व कुटुंबीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
तरुणीवर उपचार सुरू
सोमवारी दुपारी २.१५ वाजता गजाननने पूजाच्या कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापिकेसमक्ष स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले व पूजालाही कवेत घेतले. यात गजानन ९५ टक्के, तर पूजाही ४० टक्के भाजली. रात्री उशिरा गजाननचा मृत्यू झाला, तर पूजावर उपचार सुरू आहेत.
गजाननचा जबाब…
‘पूजाने माझ्याशी लग्न केले, नंतर विश्वासघात केला. मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले. असे असतानासुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला टाळते. पोलिसांकडे तक्रार केली. माझ्या खऱ्या प्रेमाला ती ओळखू शकली नाही. आता आपणही जगायचे नाही अन् तिलाही जिवंत ठेवणार नाही असा निर्णय घेत हे पाऊल मी उचलले,’ असा जबाब गंभीर भाजलेल्या गजाननने पोलिसांना दिला.
दोघांनाही फेलाेशिप मिळणार होती
पूजा व गजानन दोघेही जीवभौतिकशास्त्र या एकाच विषयात पीएचडी करतात. गुणवत्तेच्या आधारे दोघांनाही फेलाेशिप मिळणार होती. असे असताना गजाननने उचललेले हे टोकाचे पाऊल मित्रांना आणि प्राध्यापकांना धक्का देणारे ठरले. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा व गजानन या दोघांमध्ये आधी मैत्री होती, पण काही महिन्यांपासून बिनसले होते. गजानन हुशार होता. त्याने इतर विषयांत लक्ष न देता संशोधकावर लक्ष केंद्रित करावे यासाठी प्राध्यापकांनी त्याची समजूतही काढली होती. मी सगळं विसरलो आहे, असे तो सगळ्यांना सांगायचा. पण कायम टेन्शनमध्ये असायचा. काही दिवसांपूर्वी त्याने ‘ओळखीचा चांगला वकील आहे का?’ अशी विचारणा एका मित्राकडे केली होती. याच मानसिक तणावातून त्याने विद्यापीठ परिसरात यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
गंभीर भाजलेल्या पूजाचा जबाब
४० टक्के भाजलेल्या अवस्थेतील पूजाचा पोलिसांनी जबाब घेतला. तिने सांगितले, ‘माझी इच्छा नसताना गजानन पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी वारंवार त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने एकले नाही. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात गेले.’ दरम्यान, पूजाच्या नातेवाइकांनी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. कलम ३०७ नुसार यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. शेतकरी कुटुंबातून आलेली पूजाही सहा बहिणीत सर्वात हुशार आहे. पीएचडी झाल्यानंतर तिला प्राध्यापकाची नोकरी लावण्यासाठी मी मंत्री अब्दुल सत्तार यांना विनंती देखील केली होती, असे तिच्या आईने हंबरडा फोडून सांगितले.
स्वत:च्याच दुचाकीतील पेट्रोल बाटलीत आणल्याचा संशय
मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपली गाडी होस्टेलवर लावून गजानन मित्राच्या दुचाकीवर पूजाच्या कॉलेजमध्ये गेला होता. सोबत एक पिशवीही होती. पंपावर बाटलीत पेट्राेल दिले जात नाही. त्यामुळे त्याने आपल्या दुचाकीतून दोन बाटल्या भरून पेट्रोल काढले असावे, टाकी रिकामी झाल्यामुळे मित्राच्या दुचाकीवर त्यान पूजाचे कॉलेज गाठले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पूजाने पोलिसांत तक्रार दिल्यापासून गजानन जास्तच अस्वस्थ होता. इकडे पोलिस त्याच्यावर कारवाई करेपर्यंत तू कॉलेजला जाऊ नको, असे पूजाच्या कुटुंबीयांनी तिला सांगितले होते. पूजाला पाच बहिणी आहेत. तिचे वडील देखील शेतकरी होतेे. मात्र काही महिन्यांपूर्वीच ते वारले. मोठा भाऊ शेती करतो. तिच्या आईलाही मुलीकडून खूप अपेक्षा होत्या.
विद्यापीठाने नेमली चौकशी समिती, दोन दिवसांत देणार अहवाल
कुलगुुरूंनी तातडीने कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय चौकशी समिती नेमली. यात विभागप्रमुख डॉ. ई. आर. मार्टिन व डॉ. अंजली राजभोज हे सदस्य आहेत. त्यांना दोन दिवसात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या सदस्यांसह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, सुरक्षा अधिकारी बी. एल. इंगळे यांनी घाटीत रात्री भेट घेऊन दोघांबद्दल विचारपूस केली.
या जन्मात माफ करा, तुमचे ऋण पुढच्या जन्मी फेडेन..!
‘सत्य जिंकले पाहिजे, अन्यथा मुक्या यंत्रणेचा धिक्कार’
मृत्यूपूर्वी गजाननने बोर्डवर आई-वडिलांसाठी भावनिक मजकूर लिहिला. सुरुवातीला ओम लिहून नऊ ओळी लिहिल्या. ‘मला ब्लॅकमेल करून फसवलं. फूस लावली. लग्न करण्यास भाग पाडून अडीच लाख रुपये घेतले. तिच्या टॉर्चरमुळे मी ३ वेळेस सुसाइडचा प्रयत्न केला. त्यांनी मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पुढच्या जन्मात तुमचे ऋण फेडेन. मला माफ करा. माझ्या चारित्र्यात खोट नाहीये. सत्य जिंकलेच पाहिजे, नसता या मुक्या यंत्रणेचा धिक्कार असेल,’ असे त्याने लिहून ठेवले होते.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.