पुण्यात इंजिनिअर पतीने इंजिनिअर पत्नीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या इंजिनिअर पतीचं नाव राजेंद्र गायकवाड असं आहे. हत्या करण्यात आलेल्या इंजिनिअर पत्नीचं नाव ज्योती गायकवाड असं आहे. मयत ज्योती 28 वर्षांची असून, आरोपी राजेंद्र गायकवाडचं वय 31 वर्ष आहे.
राजेंद्र गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. काही महिन्यापूर्वी ज्योती बाळंतपणानंतर घरी आली होती. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र आणि ज्योती हे पती पत्नी एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होते. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले होते. जूनमध्ये ज्योतीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर ती पहिल्यादाच फुरसुंगी येथील घरी आली होती.सोमवारी (5 डिसेंबर) सकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. राजेंद्रने वादातून धारदार चाकूने ज्योतीवर सपासप वार केले. यात ज्योती गंभीर जखमी झाली. ही बाब राजेंद्र याने स्वतःच घरमालकाला सांगितली.घरमालकानं पोलिसांना याबाबत कळवलं आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या ज्योतीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. जखमी ज्योतीचा मृत्यू झाला होता.
राजेंद्र गायकवाडने पत्नीची हत्या का केली? राजेंद्र गायकवाड आणि ज्योती यांच्यातील वादाचं कारणही समोर आलं आहे. राजेंद्र गायकवाड याने पत्नीची हत्या केल्याची कबुलीही दिलीये. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती आयटी कंपनी इंजिनिअर होती. तिच्या चारित्र्यावर राजेंद्र गायकवाड संशय घेत होता. त्यातूनच त्यांच्या वाद सुरू होते.
राजेंद्र गायकवाड ज्योतीचा पगार स्वतःकडे घेत होता. त्याचबरोबर तिल माहेरून पैसे आणायला लावत होता, असा आरोप करण्यात आला आहे.चारित्र्यांच्या संशयावरून सुरू असलेल्या वादातून राजेंद्रने ज्योतीवर धारदार शस्त्राने हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी ज्योतीची हत्या केल्याप्रकरणी पती राजेंद्रला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून, या घटनेमुळे अवघ्या काही महिन्याचं बाळ आईच्या प्रेमापासून दुरावलं गेलं आहे.