धक्कादायक : भाड्याने दिलेल्या खोलीत मिठात पुरलेला मृतदेह आढळल्याने घरमालकाची बोबडीच वळली

Spread the love

वाळूज (औरंगाबाद) : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबादच्या वाळूजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळूजमधील समता कॉलनी कामगार वसाहतीतील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात बुधवारी सायंकाळी मिठात पुरलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर असून यात तळमजल्यात ७ तर वरच्या मजल्यात ३ रूम बांधलेल्या आहेत. ७ महिन्यांपूर्वी शेळके यांनी काकासाहेब भुईगड (रा. धानोरा, ता. फुलंब्री) यांना तळमजल्यात दोन खोल्या किरायाने दिल्या होत्या. भुईगड हे पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास होते. नवरात्रात भुईगड यांनी शेळके यांना धानोरा येथे चाललो असल्याचे सांगितले होते. यानंतर भुईगड कुटुंबासह निघून गेले. दरम्यानच्या कालावधीत भुईगड यांच्याकडे एक महिन्याचे भाडे थकीत असल्याने शेळके हे मोबाइलवर अधूनमधून पैसे मागत होते. थकीत भाडे लवकरच आणून देण्याचे आश्वासन भुईगड देत होते.

घराच्या किचनमध्ये मिठात पुरलेला मृतदेह सापडला

शेळके यांनी बुधवारी भुईगड यांना फोन केला. मात्र, भुईगडचा मोबाइल बंद असल्याने, तसेच भाडे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेळके यांनी सकाळी भुईगड यांच्या खोल्यांचे कुलूप तोडले. शेळके यांना घरातील गृहपयोगी साहित्य गायब असल्याचे दिसले. किचन ओट्याखाली खोदकाम करून तो सिमेंट-वाळूने बंद केलेला, तसेच त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड व लिंबू ठेवलेले दिसून आले. शेळके यांनी खोदकाम सुरू केले. एका चादरीत मिठात गुंडाळलेला कुजलेला मृतदेह दिसल्याने शेळके यांची बोबडीच वळली. ही माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहा. आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक सचिन इंगोले, सहा.फौजदार सखाराम दिलवाले, पोकॉ. गणेश लक्कस आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मृतदेह महिलेचा की पुरुषाचा, हेही गूढच आहे.

भाडेकरूच्या शोधासाठी पथक रवाना

पोलिसांनी भुईगडवर संशय व्यक्त केला. कुटुंबासह फरार असलेल्या भुईगडच्या शोधासाठी वाळूज पोलिस ठाण्याचे पथक त्याच्या मूळ गावी रवाना करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार