फिफा विश्वचषक २०२२- अर्जेंटिना ३६ वर्षानंतर पुुन्हा विश्वविजेते, लिओनेल मेस्सीचं स्वप्न पूर्ण

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये रविवारी फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना झाला. अपेक्षेप्रमाणे फायनलचा सामना रंगतदार झाला. निर्धारित ९० मिनिट आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेमध्ये प्रेक्षकांनी फुटबॉलचा सर्वोच्च थरार अनुभवला. दोन्ही संघ ३-३ अशा गोल बरोबरीत राहील्याने पेनल्टी शूटआऊटद्वारे निर्णय झाला. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ असा निर्णायक विजय मिळवला. कतारमधील फिफा विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला आहे. अर्जेंटिनाने विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरे विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाच्या संघाने यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. याशिवाय अर्जेंटिना तीन वेळा (१९३०, १९९०, २०१४) उपविजेता ठरला आहे. तर, फ्रान्स संघाचे सलग दुसऱ्यांदा आणि एकूणच तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी फ्रान्सचा संघ १९९८ आणि २०१८ मध्ये विश्वविजेता बनला होता.

सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने २-० अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रामध्ये फ्रान्सने दोन गोल करुन बरोबरी साधली. अर्जेंटिना आणि फ्रान्स दोन्ही संघांनी प्रत्येकी २ वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. उपांत्य फेरीमध्ये अर्जेंटिनाने क्रोएशिया आणि फ्रान्सने मोरक्कोला हरवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता.

कोणी कधी गोल केला:-

२२ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. कारण डेम्बेलीने डिमारयाला बॉक्सच्या आत पाडलं. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळाली. अर्जेंटिनाने ३६ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. एंगेल डिमारियाने अर्जेंटिनाची आघाडी वाढवली. लिओनेल मेस्सीने मॅक एलिस्टरकडे पास दिला. त्याने डावीकडून डिमारियाकडे चेंडू पास केला. त्याने कुठलीही चूक न करता दुसरा गोल केला.

७९ व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. अर्जेंटिनाच्या ओट्टामेंडने बॉक्सच्या पाठीमागून फाऊल केला. पंचांनी सरळ पेनल्टी किक दिली. फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने पहिली पेनल्टी घेतली. कुठलीही चूक न करता त्याने चेंडू गोल जाळ्यात धाडला आणि फ्रान्सचा पहिला गोल झाला. दोनच मिनिटांनी ८२ व्या मिनिटाला किलियन एमबाप्पेने दुसरा गोल केला. सामना संपायला ८ मिनिटं बाकी असताना फ्रान्सने दुसरा गोल केला. उजवीकडून किंग्सलेने मेस्सीकडून चेंडूचा ताबा घेतला. वेगाने पुढे जात डावीकडे एमबाप्पेकडे पास दिला. त्याने फ्रान्ससाठी दुसरा मैदानी गोल केला. मार्टिनेज हा गोल रोखण्यात अपयशी ठरला.

९० मिनिटांत दोन्ही संघांनी २-२ अशी बरोबरी साधली आणि सामन्याच्या निकालासाठी अतिरिक्त ३० मिनिटं वेळ देण्यात आली. १०८ व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी लिओनेल मेस्सीने तिसरा गोल केला. उजवीकडून आक्रमण करताना अर्जेंटिनाने फ्रान्सच्या बॉक्समध्ये चेंडू धाडला. गोलकीपर लॉरिसने हा चेंडू रोखला. पण मेस्सीने प्रचंड वेगात येऊन चेंडू गोल जाळ्यात धाडला.

सामन्यात ११६ व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. एमबाप्पेने जोरदार शॉट मारला. अर्जेंटिनाच्या बचावपटूच्या हाताला चेंडू लागला. एमबाप्पेने पेनल्टीवर गोल करण्यात कुठलीही चूक केली नाही. त्याने अंतिम फेरीमध्ये गोलची हॅट्रीक केली. विश्वचषक अंतिम फेरीमध्ये हॅट्रीक करणारा एमबाप्पे पेले यांच्यानंतर दुसरा खेळाडू बनला आहे.

किलियन एमबाप्पेला गोल्डन बूट

या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक साधल्यानंतर किलियन एमबाप्पे आता गोल्डन बूटचा दावेदार बनला आहे. या विश्वचषकात त्याने सर्वाधिक ८ गोल केले आहेत. तर लिओनेल मेस्सीने या विश्वचषकात एकूण ७ गोल केले आहेत.

१) किलियन एमबाप्पे (फ्रान्स) – ८ गोल
२) लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) – ७ गोल
३) ऑलिव्हियर जिरूड (फ्रान्स) – ४ गोल
४) ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना) – ४ गोल

पेनल्टी शूटआउट

फ्रान्सने पहिला गोल केला (किलियन एमबाप्पे)

अर्जेंटिनानेही पहिला गोल केला (लियोनेल मेस्सी)

फ्रान्सचा दुसरा गोल हुकला (किंग्स्ले कोमान)

अर्जेंटिनाने दुसरा गोल केला (पाउलो डायबाला)

फ्रान्सचा तसरा गोल हुकला (ऑरेलिन शुओमनी)

अर्जेंटिनाने तिसरा गोल केला (लियांड्रो पेरेडस)

फ्रान्स संघाने चौथा गोल केला (रँडल कोलो मुआनी)

अर्जेंटिनाने चौथा केला (गोंजालो मोंटियाल)

एन्झो फर्नांडिसला यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर स्पर्धेतील गोलरक्षकासाठी गोल्डन ग्लोव्हज हा पुरस्कार एमिलियानो मार्टिनेझला देण्यात आला. तर गोल्डन बॉल हा पुरस्कार लियोनेल मेस्सीला देण्यात आला.

टीम झुंजार