राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची – मंत्री छगन भुजबळ
मुंबई,नाशिक,दि.२५ जानेवारी :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील शौर्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जणांना शौर्य पदक, चार जणांना उल्लेखनीय सेवा तर ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हा बहुमान प्राप्त झाला आहे. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असून आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान राष्ट्रपती पदकाद्वारे करण्यात येतो. हा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बहुमान असून पुरस्काराने त्यांच्यावर अधिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी ही अतिशय महत्त्वाची असून त्यांचा झालेला सन्मान हा राज्याची मान या गौरवाने अधिक उंचावली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सात जणांना शौर्य पदक, चार जणांना उल्लेखनीय सेवा तर ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हा बहुमान प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक शहर पोलिस दलातील उपनिरीक्षक संजय अण्णाजी कुलकर्णी यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.