मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाचं आज अखेर सूप वाजलं. दोन आठवडे चाललेल्या या अधिवेशनात लोकायुक्त विधेयकाला मंजुरी हे खास वैशिष्टये ठरले. त्याचबरोबर आदित्य ठाकरें वरील आरोप-प्रत्यारोप, दिशा सालियन मृत्यू प्रकरण, जयंत पाटलांचं निलंबन, अब्दुल सत्तारांवरील आरोप, मुख्यमंत्र्यांवर भूखंड वाटपाचा आरोप, नितीश देशमुखांची पोलिसांना दादागिरी, अजित पवार व फडणवीसांची एकमेकांवरील टोलेबाजी यासह अनेक मुद्यांनी नागपुरातील हे अधिवेशन चांगलंच गाजलं. या अधिवेशनात कर्नाटक सीमावादासंदर्भात ठराव मंजूर करून कन्नडिगांना चपराप लावण्यात आली. आज हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं असून आता २७ फेब्रुवारी २०२३ पासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे कार्यालय बाळासाहेबांच्या शिवसेनेने ताब्यात घेतले व तेथून उद्धव व आदित्य ठाकरेचे फोटो हटवले. त्यानंतर उद्धव ठाकरे व दीपक केसरकरांचा आमना-सामना झाला व उद्धव यांनी केसरकरांना चांगलेच सुनावले. मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख केला तर त्याला उत्तर देताना फडणवीसांनी सुनेत्रा वहिनींना विचारले का, असा सवाल केल्याने सभागृहात हास्यकल्लोळ झाला. सभागृहाबाहेर ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला.दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सीमेवरील काही गावे केंद्रशासीत प्रदेश करण्याची मागणी केली.
याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपशब्द बोलल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. त्यानंतर सभात्याग करत विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गेल्या नऊ दिवसांच्या तुलनेत आज सर्वाधिक लक्षवेधी लागल्या. याशिवाय नियम २९३ अन्वये जास्त चर्चा झाली. विरोधकांनी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत उत्तर दिले. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरात विरोधांनी लावलेल्या सर्व आरोपांवर सरकारकडून उत्तर दिले.
दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे अडचणीत?
विरोधकांनी एनआयटीचे भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना अडचणीत आणत दिशा सालियन प्रकरण उकरून काढले व फडणवीसांनी लगेच एसआयटी चौकशीची घोषणाही करून टाकली.
दोन आठवडे चाललेल्या या अधिवेशनात पहिल्या आठवड्यात काही विशेष कामकाज झाले नसले तरी दुसऱ्या ठवड्यात दोन्ही सभागृहांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले, तर दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर आंदोलन करत आदित्य ठाकरेंची चौकशीची मागणी केली. त्यानंतर फडणवीसांनी दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची घोषणा केली.
अब्दुल सत्तार बंगल्या ऐवजी कृषी विभागाच्या विश्रामगृहावर
वाशीम जिल्ह्यातील गायरान घोटाळा प्रकरणात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विरोधकांनी वेलमध्ये येऊन आंदोलन केले. अब्दुल सत्तार यांचा विषय समोर आला. ते शासकीय बंगल्यावर न जाता कृषी विभागाच्या विश्रामगृहावर गेले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाजपचे सर्व नेते, आमदार रेशीमबाग येथे अभ्यास वर्गासाठी गेले. भूखंड घ्या, कुणी श्रीखंड घ्या, असे भजन गात, टाळ वाजवून अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले. बॉम्ब फोडू म्हणाले लवंगी फुसके फटाके निघाले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. बॉम्ब आमच्याकडे आहेत, ते यापुढे आम्ही फोडणार आहोत, असेही त्यांनी सांगितले होते.नियम ११० अन्वये कर्नाटक सीमा प्रश्नी सीमावर्ती भागातील मराठी लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. तो एकमताने मंजूर झाला. याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्थगिती देणाऱ्या अर्जाला न्यायालयाने नामंजूर केला आणि त्यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
काल उशिरा रात्री ४७ आमदारांच्या सहीचे राहुल नार्वेकरांवर अविश्वास प्रस्ताव देण्यासंदर्भातील पत्र विधीमंडळ सचिवांना देण्यात आले. पण त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नव्हती आणि याबाबत मला काहीही माहिती नाही, असे त्यांनी रात्री उशिरा माध्यमांना सांगितले.
विरोधकांनी ‘राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा’ घोषणा दिल्या
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज, शुक्रवारीही विरोधकांनी ‘राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा’ घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक बुजगावणे लावून घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे’, ‘राज्यपाल झाले भाज्यपाल’, ‘चोर है चोर है राज्यपाल चोर है’ च्या घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा देऊन विधान भवन परिसर दणाणून सोडला. अधिवेशनाचा कालावधी पुरेसा नसून तीन आठवड्यांचे अधिवेशन अपेक्षित असल्याची मागणी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची बोलून दाखविली.