जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा व मेहुणबारे या दोन गावांमध्ये अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यातील पातोंडा गावाजवळील घटनेत दाम्पत्याच्या वाहनाला अपघात झाल्याने यात सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नववधूचा मृत्यू झाला असून पती जखमी झाला आहे. तर दुसरकडे मेहुणबारे गावाजवळ ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टरखाली चिरडून साखरपुडा होऊन लग्नाची तयारी सुरू असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रियंका उमेश रोकडे (वय २२, रा.पातोंडा ता. चाळीसगाव) असं मृत नववधूचे तर मोहन भाईदास सोनवणे (वय २६, रा.जामदा, ता. चाळीसगाव) असं तरुणाचं नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील गुरूमाऊली हार्डवेअरचे मालक उमेश रोकडे व त्याची पत्नी प्रियंका रोकडे हे दोघही काही कामानिमित्त नाशिकला जात होते. त्यासाठी २९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरातून मोटारसायकलने पातोंडा येथून चाळीसगाव रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी ते निघाले होते. यादरम्यान पातोंडा गावाजवळून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर चाळीसगाव-भडगांव रोडवर समोरुन अचानक भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाच्या प्रकाशाझोतामुळे लाईट डोळ्यावर चमकून उमेश यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकी रस्त्याच्या खाली कोसळली. यात दुचाकीवरून पडून प्रियंका यांच्या डोक्याला दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश यांनाही जबर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले.
काही वेळाने थोडी शुद्ध आल्यावर उमेश रोकडे यांनी घरी फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मयत आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले. उमेश व प्रियंका यांचा नुकताच विवाह झाला होता. लग्नाला पाच ते सहा महिने झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात नववधूचा मृत्यू झाल्यामुळे पातोंडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आदल्या दिवशीही रोकडे दाम्पत्य नाशिक जाण्यासाठी निघाले होते, मात्र उशीर झाल्याने रेल्वे निघून गेली होती, दुसऱ्या दिवशी पुन्हा रेल्वे स्थानकावर जाताना अपघाताची दुर्देवी घटना घडली.
साखरपूडा झाला…१० जानेवारीला होणार होता विवाह…हळद लागण्यापूर्वी तरुणावर अपघाताच्या रुपाने काळाची झडप
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून अपघात झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. यात ट्रॅक्टरखाली चिरडून मोहन भाईदास सोनवणे याचा मृत्यू झाला. मोहन भाईदास सोनवणे हा मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावरुन ट्रॅक्टरवर बसून जात असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने मोहनचा जागीचा मृत्यू झाला. मोहनचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. १० जानेवारीला त्याचा विवाह होणार होता, त्यामुळे त्याच्या घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. मात्र त्यापूर्वीच अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला वैद्यकीय आधिकारी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.