भयंकर! ट्रॅक्टरखाली चिरडून पत्नीची हत्या; नंतर रचला अपघाताचा बनाव, पतीचं क्रूर कृत्य.

Spread the love

जालना :- एकीकडे नवं वर्षाच्या स्वागताची तयारी जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे भोकरदन तालुक्यात काळीज पिटाळून टाकणारी घटना घडली. एका नराधम पतीने आपल्याच पत्नीची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली. पतीने पत्नीला अवैध्यरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडलं, त्यानंतर अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविता साखळे (वय २९वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गजानन रघुनाथ आव्हाड याला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, गजानन आव्हाड हा औरंगाबाद महावितरण कार्यालयात कारकून पदावर कार्यरत आहे. तर कविता सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत होती. आव्हाड याने कविता साखळे या तरुणीसोबत एक वर्षापूर्वी लग्नगाठ बांधली. हा आव्हाड याचा तिसरा विवाह होता.

एका वर्षाच्या सुखी संसारानंतर गजानन आणि कवितामध्ये भांडण सुरू झालं. आरोपी गजानन याने कविताला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्याने कविताला मारहाण देखील केली. या सर्व प्रकारानंतर कविताने पोलिसांत धाव घेत गजाननविरोधात तक्रार दिली. मात्र, नातेवाईकांनी तक्रार मागे घेऊन त्यांना पुन्हा एकत्र राहण्याचा सल्ला दिला.

समजूत झाल्यानंतर आरोपी गजानन याने कविताला घेऊन औरंगाबाद शहर सोडलं. तो हसनाबाद गावात भाड्याने घर घेऊन राहू लागला. आपल्याविरोधात कविताने पोलिसांत तक्रार दिल्याचा राग आरोपी गजानन याच्या डोक्यात होता. यावरून त्याने 31 डिसेंबरला आपल्याला नातेवाईकाकडे जायचं म्हणून कविताला दुचाकीवर बसवलं.

दरम्यान, कुंभारी शिवारातील कोपडा शिवरस्त्यावर रात्री 9 ते 10 च्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गजानन याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टरखाली येऊन कविताचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे असा, आरोप मृत कविताच्या भावाने केला आहे. तशी तक्रार सुद्धा त्याने पोलिसांत दिली आहे.

अपघातात गजानन याला कुठलीच इजा झाली नसल्याचं ही आढळून आलं आहे. मात्र कवितांचा त्यात चिरडून मृत्यू झाला आहे. त्यातच अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ही गजानन यांच्या नातेवाईकांचा असल्याने गजानन वरील संशय बळावल्याने कवितांच्या भावाच्या तक्रारी वरून भोकरदन पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी गजानन याच्यासह ट्रॅक्टर चालकाला अटक केली. त्याचबरोबर मृत कविताची सासू आणि पाच नणंदाविरुद्ध घर घेण्यासाठी पाच लाख घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकणी हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास भोकरदन पोलिस करत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार