सूर्यकुमारच्या शतकाच्या बळावर भारताने मालिका २-१ अशी जिंकली

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे आजचा सामना मालिकेचा निर्णायक सामना ठरला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इशान किशन (१) पहिल्या षटकात तंबूत परतला. शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांची जोडी श्रीलंकन गोलंदाजीचा समाचार घेत असतानाच करुणारत्नेने राहुलला बाद केले. राहुलने केवळ १६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३५ धावा काढल्या.

त्याच्याजागी सूर्यकुमार यादव मैदानात उतरला आणि त्याने श्रीलंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पुढच्या ८.५ षटकांत ह्या दोघांनी १११ धावा जोडल्या आणि शुभमन गिल (४६) त्रिफाळाचीत झाला. कर्णधार हार्दिक पंड्या (४) आणि दीपक हुडा (४) धावा काढून झटपट परतले. भारताचा निम्मा संघ १६.४ षटकांत १८९ धावांवर परतला होता. पण सूर्यकुमारने अक्षर पटेलच्या सोबत पुढच्या ३.२ षटकांत ३९ धावा जोडल्या. त्यात अक्षरने केवळ ९ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा काढल्या तर सूर्यकुमारने५१ चेंडूंत ७चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११२ धावा काढल्या. भारताने २० षटकांत २२८/५ अशी धावसंख्या उभारली. श्रीलंकेच्या दिलशान मधुशंकाने ५५/२, कसुन रजिथाने ३५/१, वानिंदू हसरंगाने ३६/१ आणि चमिका करुणारत्नेने ५५/१ गडी बाद केले .

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली होत होती. पण अक्षर पटेलने कुसल मेंडीसला (२३) बाद करत खिंडार पाडलं. पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने पथुम निसंकाला (१५) धावांवर बाद केले. सलामीची जोडी ४४ धावांवर तंबूत परतली होती. श्रीलंकेचा कर्णधार आणि मागच्या सामन्याचा सामनावीर दसुन शनाका (२३) धावांवर परतला. धनंजय डीसिल्व्हा (२२) तर चरिथ असलंका (१९) युझवेंद्र चहलचे बळी ठरले. त्यानंतर सर्वाधिक धावा अवांतरच्या (१३) होत्या. श्रीलंकन संघ अवघ्या १६.४ षटकांत १३७ धावांवर परतला होता. भारताने ९१ धावांनी ह्या सामन्यासह मालिका खिशात घातली. अर्शदीप सिंगने २.४ षटकांत २०/३, हार्दिक पंड्याने ३०/२, युझवेंद्र चहलने ३०/२, उमरान मलिक (३१/२) यांनी गडी बाद केले.

सूर्यकुमार यादव (११२) सामनावीर तर अक्षर पटेलला मालिकावीर (फलंदाजी करताना ११७ धावा काढल्या तर गोलंदाजी करताना ३ गडी टिपले) पुरस्काराने गौरविण्यात आले. सूर्यकुमारने ४५ सामन्यांत ३ शतक १३ अर्धशतकांच्या सहाय्याने १५७८ धावा काढल्या आहेत. १० तारीख पासून ह्या दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका गुवाहाटी येथे सुरू होणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार