भारताचा श्रीलंकेला क्लीनस्वीप; रचला नवा इतिहास, अंतिम सामन्यात ३१७ धावांनी मात करत मालिका ३-० ने जिंकली

Spread the love

क्रीकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३१७ धावांनी विजय मिळवून मालिका ३-० ने जिंकली आणि पाहुण्यांना क्लीनस्वीप दिला. विजयासाठी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २२ षटकांत ७३ धावांत संपुष्टात आला. क्षेत्ररक्षण करताना जखमी झाल्याने अंशेन बंदारा फलंदाजीला येऊ शकला नाही. मोहम्मद सिराजने २० धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेतले. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद सिराजने असलंका फर्नांडोला एक धावेवर, तर कुसल मेंडिसला चार धावांवर बाद करून श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर मोहम्मद शमीने चरिथ असलंकला एक धावेवर बाद केले. मोहम्मद सिराजने नुवानिदू फर्नांडोचा १९ धावांवर त्रिफळा उडवत श्रीलंकेची अवस्था ७.३ षटकांत ४ बाद ३५ अशी केली. त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज विशिष्ट अंतराने बाद होत गेले.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (११० चेंडूंत नाबाद १६६) आणि शुभमन गिल (९७ चेंडूंत ११६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने ५ बाद ३९० धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (४९ चेंडूंत ४२) आणि श्रेयस अय्यर (३२ चेंडूंत ३८) यांनी मोलाचे योगदान दिले,

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ९५ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा सोळाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. ४९ चेंडूत ४२ धावा करताना त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील ४६ वे शतक झळकाविले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकविणारा तो दुसरा खेळाडू ठरला. कोहलीने ८५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या या खेळीत १० चौकार आणि १ पटकार लगावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे हे ७३ वे शतक ठरले. विराटने कसोटीत क्रिकेटमध्ये २७ शतके झळकाविली तर टी-२० क्रिकेटमध्ये एक शतक ठोकले आहे. कोहलीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शुभमन गिलने एकदिवसीय कारकीर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर शुभमन ३४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. ९७ चेंडूंत ११६ धावा करताना त्याने १४ चौकार आणि २ षटकार लगावले. न्यूझीलंड संघ भारतीय दौर्‍यावर येणार आहे. त्यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १८ जानेवारी पासून सुरूवात ‍होत आहे.

टीम झुंजार