एरंडोल येथे शिवसेना विरुद्ध भाजप,राष्ट्रवादी राजकीय संघर्षास सुरुवात;काय आहे घटना?

Spread the love

एकाच पुलाचे दोघांकडून वेगवेगळ्या दिवशी स्वतंत्र भूमिपूजन.

एरंडोल-येथील अंजनी नदीवर बांधण्यात येणा-या रंगारी खिडकी ते गांधीपुरा या पुलाचे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस स्वतंत्र भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे शहरात शिवसेना विरुद्ध भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस असा राजकीय संघर्ष सुरु होणार आहे.शहराच्या इतिहासात प्रथमच कार्यक्रमांचे स्वतंत्र आयोजन करण्यात आल्यामुळे आगामी काळात होणा-या नगर पालिका निवडणुकीत या वादाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असणा-या एरंडोलमध्ये राजकीय संघर्षाचे वातावरण निर्माण करण्याचा कुटील डाव आखला जात असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

अंजनी नदीच्या पुलावर रंगारी खिडकी ते गांधीपुरा या पुलाच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे.या पुलामुळे गांधीपुरा आणि गाव यातील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेनेतर्फे रविवारी(ता.३०) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ,संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील,जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची निमंत्रणपत्रिका छापण्यात आली असून अन्य प्रमुख मान्यवरांमध्ये काही नावे वगळता केवळ शिवसेनेच्या पदाधिका-यांचा समावेश आहे.

निमंत्रक म्हणून शिवसेना,युवासेना,युवतीसेना आणि महिला आघाडी असून स्वागतोत्सुक म्हणून शिवसेना नगरसेवक आणि नगरसेविकांची नावे आहेत.विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी पाच वर्ष भाजप,राष्ट्रवादी युतीला नगरपालिकेत समर्थन दिले होते.सदर पुलाच्या मंजुरीसाठी पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी कोंग्रेसच्या सदस्यांनी प्रयत्न करून देखील केवळ पक्षद्वेशामुळे कार्यक्रमात स्थानिक भाजप व राष्ट्रवादी कोंग्रेसच्या नगरसेवकांना डावलल्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही पक्षाच्या पदाधिका-यांनी शनिवारी (ता.२९) सदर पुलाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला.भाजप राष्ट्रवादी कोंग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमात पुलाचे भूमिपूजन योगगुरू पी.ओ.बडगुजर आणि हाजी अहमदखा करीमखा यांच्याहस्ते करण्यात येणार असून भाजपचे प्रदेश जनजाती क्षेत्र प्रमुख advt.किशोर काळकर अध्यक्षस्थानी राहणारआहेत.तत्कालीन नगराध्यक्ष रमेश परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंधरा नगरसेवकांची नावे आहेत.सदर पुलाच्या बांधकामासाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या कारकीर्दीतच नगरपालिकेतर्फे प्रस्ताव करण्यात आला होता.पुलाच्या बांधकामासाठी लागणा-या निधीच्या मंजुरीसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी प्रयत्न केले आहेत.नगरपालिका आणि आमदार चिमणराव पाटील या दोघांच्या प्रयत्नांमुळे पुलासाठी निधी मंजूर झाला असून विकास कामांमध्ये पक्षीय राजकारण न आणता सर्वपक्षीय पदाधिका-यांच्या उपस्थितीत पुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज होती अशी भावना भाजप आणि राष्ट्रवादी कोंग्रेसच्या नगरसेवकांनी व्यक्त केली.पुलाचे भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत केवळ शिवसेना पदाधिका-यांचा उल्लेख असल्यामुळे नाईलाजास्तव भाजप,राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करावे लागल्याची प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली.

  
टीम झुंजार