झुंजार प्रतिनिधी l पारोळा
पंचायत समिती चे गटविकास अधिकारी तथा प्रशासक विजय लोंढे हे मनमानी पणे पंचायत समितिचा कारभार करीत आहेत. त्यांची तात्काळ बदली करा अशी मागणी तालुक्यातील सरपंच व माजी सरपंच यांनी आमदार चिमणरावजी पाटील यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या शिवसेना कार्यलयात आज तालुक्यातील विविध सरपंचाची बैठक झाली.
बैठकीत सरपंच माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य या साऱ्यांनी गटविकास अधिकारी विजय लोंढे व विस्तार अधिकारी यांच्या मनमानी व आढमुठी कारभार विषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. पंचायत समितीत रोजगार हमी योजना अंतर्गत लावण्यात आलेली शेवगे वृक्षांची मस्टर अर्थात मजुरांची मजुरी मंजूर करण्यासाठी प्रत्येक मजुरा मागे पाचशे तर हजार रुपये मागितले जातात. ते पैसे दिले नाहीत तर मजुरांची मजुरी मंजूर केली जात नाही. यासाठी काही ग्रामरोजगार सेवक हे।मध्यस्थी करतात असा आरोप यावेळी करण्यात आला.

तसेच शेत पाणंद रस्त्याची कामना मंजुरी दिली जात नाही. शबरी योजना अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी देखील प्रति लाभार्थी हजार रुपये घेतले जातात. सरपंच, इतर पदाधिकारी व नागरिक यांनी काही माहिती घेण्यास किंवा आर्थिक पिळवणूक संदर्भात गटविकास अधिकारी यांना जाब विचारला तर ते शासकीय कामात अडथळा आणतो गुन्हा दाखल करतो. असे दम भरतात अश्या तक्रारी यावेळी उपरोक्त उपस्थित आजी माजी पदाधिकारी यांनी करून गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची तात्काळ बदली करा अशी एकमुखी मागणी लावून धरली होती.

ग्रामविकास मंत्रीकडे तक्रार
सरपंच व सदस्य यांच्या आजची मागणी व पूर्वीच्या तक्रारी याची दखल घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गटविकास अधिकारी यांच्या वाढत्या तक्रारीची तक्रार करून त्यांची बदली करण्याची सूचना भ्रमनध्वनी वरून केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील त्याबाबत कार्यवाही चे आश्वासन आमदार पाटील यांना दिले आहे.