ग्रामसेवकाशी संगनमत करून बनावट जन्माचा दाखला !

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी

निपाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाशी संगनमत करून बनावट जन्म दाखला देण्यात आल्याचा गंभीर प्रकार ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी उघडकीस आणल्याने एरंडोलमधे एकच खळबळ माजली आहे.

उल्हास नगर महापालिकेत जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या युवराज धोंडू भदाणे याने ग्रामपंचायतीच्या जन्म नोंदणी रजिस्टर मधे फेरफार करून “भाऊसाहेब” यांच्या जन्म दाखल्याची नोंद असलेल्या २४ क्रमांकाच्या नोंदीत ऑगस्ट २०१८ साली स्वतःचे “युवराज” हे नाव वेगळ्याच शाईत व वेगळ्याच हस्ताक्षरात लिहून बनवेगिरी केल्याचे एरंडोल पंचायत समितीचे गट विकास अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले. जन्म नोंद रजिस्टरमधे अवैधरित्या फेरफार करणे गंभीर फौजदारी गु्न्हा आहे.

हा प्रकार निदर्शनास येताच गट विकास अधिका-यांनी “२०१४ साली दस्तऐवजांचे स्कॅन केलेल्या रजिस्टर बरोबर पडताळणी करून जर फेरफार केला असेल तर” तसा अहवाल जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ पंकज आशिया यांच्याकडे फौजदारी कारवाई करण्याबाबत शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन तक्रारदार ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांना दि.२४ जानेवारी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दिले.

या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी गेल्या महिन्यात दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना प्रत्यक्ष भेटून सबळ पुराव्यानिशी लेखी तक्रार केली होती.सदर गंभीर तक्रारीची दखल घेत त्यांनी गट विकास अधिकारी़, एरंडोल यांना चौकशीचे आदेश दिले होते.

टीम झुंजार