मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अदानी कार्पोरेटद्वारे जनतेची केलेली फसवणूक ‘हिंडेनबर्ग रिपोर्ट’च्या माध्यमातून उघड झाली आहे. यामध्ये एल.आय.सी. व स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक संस्थांची ८७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याने, या संस्थांसह विविध बँकांनी दिलेली कर्जे धोक्यात आहेत. अदानी कार्पोरेट व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत. किंबहुना भाजपा निवडणुकीत वैध-अवैध मार्गाने अदानीचाच पैसा वापरत असल्याने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या अदानी कॉर्पोरेटबद्दल संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यास मोदी सरकार नकार देत आहे. याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेत गुन्हेगारी स्वरूपाचा घोटाळा उघड झाल्यानंतरदेखील केंद्र सरकार, सेबी, ईडी, सी.बी.आय. या केंद्रीय संस्थांनी कोणतीही चौकशी करण्यास नकार दिला आहे. ‘सेबी’ या संस्थेच्या महत्वाच्या कमिटीवर अदानीचे नातलग व्यक्तीच कार्यरत आहेत. त्यामुळे अदानी घोटाळ्याचे सत्य बाहेर आणण्यासाठी या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करून, संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच एल.आय.सी. आणि एस.बी.आय. या सार्वजनिक संस्थांची ८७ हजार कोटी रुपयांची अदानी कार्पोरेटमधील गुंतवणूक तत्काळ सक्तीने वसूल करावी व दोषी संचालकावर गुन्हे दाखल करून जनतेच्या हिताचे रक्षण करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने १३ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉ. लांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मोदी सरकारचा नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प अत्यंत फसवा, धूळफेक करणारा आणि सट्टेबाजार व कार्पोरेट कंपन्यांच्या हितसंबंधाची भलावण करणारा असून, शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या लुबाडणूकीला प्रोत्साहन देणारा आहे. केंद्र सरकारने ३८३ दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करण्याच्या आश्वासनास हरताळ फासला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात येईल हे निवडणुकीत दिलेले आश्वासन केवळ भूलथापा देणारे ठरले आहे.
उलट शेती उत्पादनास आवश्यक खते, शेती अवजारे, ट्रॅक्टर यावर १२% ते १८% जीएसटी कर लावून व खतावरील सब्सिडीत २५ हजार कोटीची कपात करून, उत्पादन खर्च मात्र दुपटीपर्यंत नेला आहे. याविरुद्ध शेतकरी पुन्हा लढा करतील. भारतातील जनतेचे दरडोई उत्पन्न दुप्पट झाल्याचे धांदांत खोटे विधान करून संसदेची प्रतिष्ठादेखील संपुष्टात आणली जात आहे. अर्थमंत्री यांनी २०१४ पासून आजपर्यंत दरडोई उत्पन्न दुप्पट केल्याचा दावा संपूर्णतः खोटा असून, शासनाच्या आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारीशी विसंगत आहे, अशी टीकाही कॉ. लांडे यांनी केली आहे.देशव्यापी आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उद्या १३ फेब्रुवारी २०२३ आंदोलन करण्यात येईल त्यात मोठया संख्येने समविचारी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरचिटणीस कॉ. ॲड. सुभाष लांडे सहसचिव कॉ. राजू देसले, कॉ. डॉ. राम बाहेती यांनी केले आहे.
हे पण वाचा
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.