कुऱ्हा काकोडा, जि.जळगाव : सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनासमोर पट्टेदार वाघ येऊन उभा राहिला आणि वाहनातील प्रवाशांची पाचावर धारण बसली. मात्र, काही सेकंदातच वाघाने जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. शनिवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कुऱ्हा काकोडा येथील तीन जणांनी हा थरार अनुभवला.
कुऱ्हा काकोडा ग्रा.पं.चे उपसरपंच अनिल पांडे हे सचिन भोईटे आणि रमेश बगे यांच्यासोबत सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी कारने निघाले होते. शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांनी डोलारखेडा गाव ओलांडले. डोलारखेडा गाव ते डोलारखेडा फाटाच्या दरम्यान लहान पुलाजवळ त्यांचे वाहन आले असता, पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. साक्षात वाघच दिसल्याने काही काळ त्यांना काही सुचले नाही. मात्र, रस्ता ओलांडत असताना वाघच त्यांच्या गाडीला आडवा आणि काही क्षणातच त्याने जंगलाचा रस्ता धरला, तेव्हा तो स्पष्ट दिसला.
कुऱ्हा काकोडा ते मुक्ताईनगर या मुख्य रस्त्यावरील नांदवेल ते डोलारखेडा फाटाच्या दरम्यान रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने अनेकांना दर्शन दिले आहे. काही वेळा तर दिवसाही त्याचे दर्शन होते. रुबाबदार प्राणी असलेला वाघ जंगलात पाहणे हे जितके रोमांचकारी तितकेच धोकादायकही आहे. त्यामुळे अचानक आपल्या वाटेत आलेल्या वाघोबाला बघून दर्शनाला जात असलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया काय असतील, ती कल्पना करणेही रोमांचक आहे. साक्षात वाघ अचानक समोर आल्याने, वाहनातील मित्र काही काळ गोंधळले, तरीही अनिल पांडे यांनी वाघोबाला आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपले.
वढोदा वनपरिक्षेत्र हे पट्टेदार वाघाचे अधिवास क्षेत्र असून, वाघांसाठी संरक्षित आहे. नुकतीच त्याला अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. या भागात वाघांचा राबता हा रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर असल्याने, वाहनधारक आणि स्वतः वाघांसाठीही धोकादायक आहे. त्यामुळे वनविभागाने त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४