भुसावळ :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेऊन गेलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. खंडवा शहरापासून काही अंतरावर महामार्गावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा अपघात घडला. मंगल पाटील (४२, कृष्ण नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगल पाटील हा भुसावळ शहरातील कृष्ण नगरात वास्तव्यास होता. मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून कार्यरत होता. भाविकांना कथा श्रवणासाठी सिहोर येथे खाजगी लक्झरीने घेवून गेला होता व परतीच्या प्रवासात खंडवा शहरापासून काही अंतरावरील महामार्गावरील एका हॉटेलवर दुपारी भाविक नाश्ता करण्यासाठी थांबले. त्याचवेळी हॉटेलमध्ये काही वस्तू राहिल्याने ती घेण्यासाठी मंगल रस्ता ओलांडत असताना दुसऱ्या एका लक्झरी वाहनाने त्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला.
या घटनेने भुसावळ शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, मुले, आई, वडील असा परीवार आहे. मंगल हा घरचा कर्ता पुरूष होता, हातमजुरी करणार्या गरीब कुटुंबावर मंगलच्या मृत्यूने मोठे संकट ओढवले आहे. शनिवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण कोलते यांनी दिली. लक्झरीवर क्लिनर असलेल्या मंगलचा दुसऱ्या एका लक्झरीच्या धडकेने प्राण गेले, या दुर्दैवी योगायोग असलेल्या या घटनेने भुसावळ शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४