नवी दिल्ली – आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहे. देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी म्हणून अनेक प्रकारच्या योजनांची घोषणा त्यांनी केली आहे. अशातच सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत.
तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर 1907 रुपयांचा झाला आहे. विशेष बाब म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील तेल कंपन्यांनी 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 108.50 रुपयांची कपात केली होती.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर कोणतीही दरवाढ नाही
दुसरीकडे तेल कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी घरगुती गॅसच्या किमतीसुद्धा जाहीर केल्या आहेत. विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. याआधी 6 ऑक्टोबर रोजी गॅसची दरवाढ करण्यात आली होती. आज 1 फेब्रुवारी दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर 899.50 रूपये आहे. तर मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 915.50 रूपये इतके आहे.
पेट्रोल डिझेलचे दर पण सामान्य
1 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार आहेत.