वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा,५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खास सन्मान

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वानखेडे स्टेडियममध्ये पुतळा उभारून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास सन्मान करण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाला किंवा वर्षांच्या अखेरीस ५० षटकांच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर १० वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, “वानखेडे स्टेडियममधील हा पहिला पुतळा असणार आहे. तो कुठे ठेवायचा हे लवकरच ठरविण्यात येईल.

सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे आणि त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या ५०व्या वाढदिवशी हे एमसीएकडून एक गिफ्ट असेल. तीन आठवड्यांपूर्वीच सचिनने यासाठी परवानगी दिली आहे.” वानखेडे स्टेडियममध्ये सध्या सचिनचे नाव असलेले स्टैंड आहे. एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या नावाचा स्टैंड उभारून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.

देशात क्रिकेटपटूंचे पुतळे स्टेडियममध्ये नाहीत.विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, आंध्रमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताचे माजी महान फलंदाज सी. के. नायडू यांचे असे तीन स्वतंत्र पुतळे आहेत.मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शेन वॉर्नचा तीनशे किलो वजनाचा पुतळा आहे. २०११ मध्ये वॉर्नने अनावरणप्रसंगी म्हंटले होते की, “हा मोठा सन्मान आहे. स्वतःला पाहणे थोडे विचित्र आहे; पण मला याचा अतिशय अभिमान आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार