शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर; पालकमंत्र्यांनी दिली ग्वाही
धरणगाव / दिनांक ४ (प्रतिनिधी ) : धरणगाव शहराच्या विकासाला प्रचंड गती आली असून शहरांतर्गत पाईपलाईनच्या कामांचे लवकरच भूमिपुजन होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. विजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त व शहरातल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध विकासकामांच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाआधी ना. गुलाबराव पाटील यांची प्रभागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदारकीतील विजयापेक्षा निघालेली ही भव्य मिरवणूक एक प्रकारे शुभशकुन असल्याचे नमूद करत शहराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. आपण पालकमंत्रीपदाचा कधी रूबाब दाखविला नसून सत्तेचा उपययोग हा सातत्याने विकासासाठी कसा करता येईल याचाच ध्यास घेतला असून याचा परिणाम शहरातील विकासाच्या माध्यमातून दिसून येत असल्याचेही ना. गुलाबराव पाटलांनी आवर्जून नमूद केले.
या संदर्भातील वृत्त असे की, सामाजिक कार्यकर्ते विजय महाजन यांच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध विकासकामांचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. संजयव महाजन, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, अभिजीत पाटील, पत्रकार भरत चौधरी, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, आब्बास शागीर, विजय महाजन, राकेश चौधरी, नगरसेविका सुरेखा महाजन, वासुदेव महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विजय महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकातून गुलाबभाऊंनी आम्हाला विनम्र राहण्याचा दिलेला कानमंत्र हा विकास करतांना उपयोगात पडल्याचे आवर्जून नमूद केले. प्रभागात याचमुळे विकास करता आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
हाकेला जाणार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा : गुलाबराव वाघ
शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून धरणगाव तालुक्यातून शिवसेनेला सर्वधर्मियांचे प्रेम लाभले असून प्रत्येक हृदयात शिवसेनेला स्थान मिळाल्याचे नमूद केले. ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शहरात तब्बल १०० कोटी रूपयांची कामे मंजूर व सुरू झालेली आहे. प्रभाग १ मधे धरणी चौक ते स्मशानभूमी,बाजोठ गल्ली ते जांजी बुवा चौक, माळी मढी परीसर , रामलीला चौक,धरणी नाला बांधकाम असे विविध कामे ८ ते १० कोटी रुपयांची कामे यामुळे विकासाचे नवीन पर्व सुरू झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद करून हाकेला धावणारा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे देखील आवाहन त्यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून शहरातील विकासाला प्रचंड गतीने चालना मिळाली असून आता प्रभाग क्रमांक एक मध्ये देखील विविध विकासकामे सुरू होणार असल्याचे प्रतिपादन केले. शहराच्या इतिहासात प्रथमच इतक्या प्रचंड प्रमाणात निधी मिळाला असल्याने चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर धरणगाव तालुक्यात शासन आणि शिवसेना यांचा विचार तळागाळापर्यंत पोहचल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांनी समाधान देखील व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय महाजन, राकेश चौधरी, रमिज पटेल, उमेश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रोकडे तर आभार प्रदर्शन राजेंद्र महाजन यांनी केले.