मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ ३५.४ षटकांत १८८ धावांवर गारद झाला. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताने ३९.५ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुल लयीत परतला आणि त्याने चांगली फलंदाजी करताना ९१ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाही ४५ धावा करून नाबाद राहिला.लक्ष्याचा पाठलाग करताना एका टप्प्यावर भारताने ३९ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर राहुलने कर्णधार हार्दिक पांड्यासोबत ४४ धावांची भागीदारी केली. हार्दिक बाद झाल्यानंतर जडेजा आणि राहुल यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १०८ धावांची भागीदारी केली. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर १६ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे.
या मैदानावर दोघांमध्ये पाच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने तीन आणि ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने या मैदानावर २००७ मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. त्यानंतर २०२० मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. आता तब्बल १६ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यश मिळविले आहे.ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कांगारूंचा संघ ३५.४ षटकांत १८८ धावांत गारद झाला. एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १९.३ षटकांत २ बाद १२९ अशी होती, त्यानंतर संघाने ५९ धावा करताना आठ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मिचेल मार्श आणि मार्नस लबुशेन क्रीजवर होते. रवींद्र जडेजाने मार्शला बाद केले आणि त्यानंतर संपूर्ण संघ ३५.४ षटकांत गडगडला. म्हणजेच १७ षटकांत भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६५ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड पाच धावा करून सिराजचा बळी ठरला. यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. स्मिथला हार्दिक पांड्याने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. त्याला २२ धावा करता आल्या. यानंतर मार्शने लबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. मार्शला जडेजाने सिराजच्या हाती झेलबाद केले. तो ६५ चेंडूत १० चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ८१ धावांची धडाकेबाज खेळी करून तंबूमध्ये परतला. मार्श बाद होताच संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. लबुशेनला कुलदीपने जडेजाच्या हाती झेलबाद केले. त्याला १५ धावा करता आल्या. यानंतर मोहम्मद शमीचा कहर पाहायला मिळाला. त्याने तीन षटकांत तीन विकेट घेतल्या. २८ व्या षटकात जोश इंग्लिशचा त्रिफळा उध्वस्त करण्यात आला. इंग्लिशला २६ धावा करता आल्या. यानंतर ३०व्या षटकात कॅमेरून ग्रीन १२ धावा करून बाद झाला. त्यानंतर ३२ व्या षटकात मार्कस स्टॉइनिसला स्लिपमध्ये शुभमन गिलने झेलबाद केले. स्टॉइनिस पाच धावा करून बाद झाला.
जडेजाने मॅक्सवेलला हार्दिककडे झेल देण्यास भाग केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. त्याचवेळी सिराजने शॉन अॅबॉट आणि अॅडम झम्पा यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांत गुंडाळला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन, तर जडेजाने दोन विकेट घेतल्या. हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली. १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ३९ धावांवर भारताने आपले आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. ईशान किशन तीन, शुभमन गिल २०, विराट कोहली ४ आणि सूर्यकुमार यादव खाते न उघडताच बाद झाले. मिचेल स्टार्कने पहिल्या चारपैकी तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी स्टॉइनिसने ईशानशिवाय हार्दिक पांड्याला बाद केले. मात्र, राहुल आणि जडेजाने डाव सांभाळला आणि दडपण सहन करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने वनडे कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. त्याने ९१ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७५ धावा केल्या. त्याचवेळी जडेजाने ६९ चेंडूत ४५ धावांच्या खेळीत पाच चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने तीन आणि स्टॉइनिसने दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आता पुढील एकदिवसीय सामना रविवारी (१९) विशाखापट्टणम येथे होणार आहे.
हे देखील वाचा
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.