धक्कादायक : अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून सपासप वार करुन एकाचा खून, एरंडोल तालुक्यातील घटना.

Spread the love

एरंडोल ( कासोदा ) : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही थरारक घटना रविवारी सकाळी भातखंडे -उत्राण ता. एरंडोलनजीक घडली. सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पाटील हा रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. त्यावेळी वाहनातून आलेल्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अर्धा तास पडून असलेल्या सचिनला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या चुलत भावाने पाचोरा येथील रुग्णालयात आणले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृतदेह जळगावला जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

याप्रकरणी कासोदा ता. एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सचिन हा वाळूमाफिया असल्याने पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा, अशी शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच त्याचा गिरड ता. भडगाव येथील युवकांशी वाद झाला होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार