एकदिवसीय सामन्यात भारताचा ‘सर्वात मोठा’ पराभव,ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय; दुसरा सामना ३७ षटकांत संपला

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघाने भारतीय डाव २६ षटकांत ११७ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात त्याने ११ षटकांत १२१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. ५०-५० षटकांचा हा एकदिवसीय सामना एकूण ३७ षटकांत संपला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून २२ मार्च रोजी चेन्नई येथे होणारा तिसरा सामना एकप्रकारे अंतिम सामना असेल.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची शीर्ष फळी या सामन्यातही अपयशी ठरली. पॉवरप्लेमध्ये (सुरुवातीचे १० षटके) अर्धा संघ तंबूमध्ये परतला. स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा बाद झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला. यानंतर डावाच्या पाचव्या षटकात स्टार्कने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने रोहितला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. रोहितला १५ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १३ धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव पायचीत बाद झाला. याआधीच्या सामन्यात जसा बाद झाला होता तसाच सूर्याही बाद झाला. सूर्याला सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खातेही उघडता आले नाही.

केएल राहुल हा मिचेल स्टार्कचा पुढचा बळी ठरला. राहुलला १२ चेंडूत ९ धावा करता आल्या. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते, पण यावेळी त्याची बॅट चालली नाही. स्टार्कने राहुलला पायचीत केले. शॉन अॅबॉटने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला (१) स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हवेत झेपावत स्मिथने हा झेल टिपला. भारताला १६व्या षटकात सहावा धक्का बसला. विराट कोहली ३५ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. ९१ धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला ३९ चेंडूत १६ धावा करता आल्या. १०३ धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला (१७) हेडकरवी झेलबाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला (०) यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. स्टार्कने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव ११७ धावांत गुंडाळला.

मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पटकन सामना संपवला. मार्शने ३६ चेंडूत ६६ तर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ५१ धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने १० चौकार मारले.मिचेल स्टार्कला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ५३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. त्याने आजवर ९ सामन्यांत ५ गडी बाद केले आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार