चार वर्षांनंतर भारताने मायदेशात एकदिवसीय मालिका गमावली,तिसरी वनडेतऑस्ट्रेलिया विजयी

Spread the love

कांगारू फिरकीपटूंनी सामना फिरवला, सूर्या आणि जडेजा पराभवाचे खलनायक?

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कांगारू संघाने भारता विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना २१ धावांनी जिंकला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकाही २-१ फरकाने जिंकली. भारतीय संघाने चार वर्षांनंतर मायदेशात एकदिवसीय मालिका गमावली आहे. यापूर्वी मार्च २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ३-२ अशा फरकाने पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग सात मालिका जिंकल्या. आता पुन्हा कांगारूंनी घरच्या मैदानावर भारताचा पराभव केला आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकात २६९ धावा केल्या. ४७ धावा करणाऱ्या मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ४९.१ षटकांत २४८ धावांवर गारद झाला आणि सामना २१ धावांनी गमावला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंम्पाने चार विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६१ धावांची भर घातली. मात्र, हेड ३३ धावा करून हार्दिकचा बळी ठरला. यानंतर हार्दिकने स्टीव्ह स्मिथला खातेही उघडू दिले नाही आणि मार्शला ४७ धावांवर बाद केले. १७ धावांच्या अंतरावर तीन विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर आला आणि भारताने पुनरागमन केले. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली, पण कुलदीप यादवने दोघांनाही बाद करून सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. मार्कस स्टोइनिस आणि एलेक्स कैरी यांनी सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली, मात्र अक्षरने २५ धावांवर गिलच्या गोलंदाजीवर स्टोइनिसला झेलबाद केले. यानंतर कुलदीपने शानदार चेंडूवर कैरीला बाद केले. कैरीने ३८ धावा केल्या.

अॅबॉटने २६, एगर १७ आणि स्टार्क-झंम्पाने १०-१० धावांचे योगदान देत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६९ धावांपर्यंत नेली. भारताकडून हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी तीन, तर अक्षर पटेल आणि सिराजने प्रत्येकी दोन बळी घेतले. २७० धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि कर्णधार रोहितच्या जोडीने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. रोहित शर्मा १७ चेंडूत ३० धावा करून बाद झाला तर गिलने ४९ चेंडूत ३७ धावा केल्या. १२ धावांच्या अंतराने दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर टीम इंडिया अडचणीत दिसली, पण विराट कोहलीने राहुलसोबत शानदार भागीदारी करून भारताला सामन्यात पुढे नेले. तिसर्‍या विकेटसाठी कोहली आणि राहुलमध्ये ६९ धावांची भागीदारी झाली. ३२ धावांवर झंम्पाने राहुलला बाद केले. या सामन्यात अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र कोहलीसोबत झालेल्या गैरसमजामुळे तो अवघ्या दोन धावांवर धावबाद झाला. मात्र, विराटने एका टोकाला उभे राहून संथगतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. मात्र, एश्टन एगरने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना एकाच षटकात बाद करून सामन्याचे चित्र फिरवले. १८५ धावांवर सहा विकेट गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. यानंतर जडेजा आणि पांड्याने ३३ धावांची भागीदारी केली, पण वेग वाढवण्याच्या नादात पांड्या ४० धावांवर बाद झाला. येथूनच भारताच्या विजयाच्या आशा क्षीण झाल्या. यानंतर जडेजाही १८ धावा करून बाद झाला आणि भारताचा पराभव निश्चित झाला.

या सामन्यात रवींद्र जडेजा फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही. तो फलंदाजीला उतरला तेव्हा भारतासाठी लक्ष्य अवघड नव्हते, पण त्याने अतिशय संथ फलंदाजी केली. यामुळे हार्दिकवर दडपण आले आणि तो खराब शॉट खेळून बाद झाला. हार्दिकपाठोपाठ जडेजाही खराब शॉट खेळून तंबूमध्ये परतला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. संपूर्ण मालिकेत त्याने एकूण तीन चेंडूंचा सामना केला आणि प्रत्येक चेंडूवर तो बाद झाला. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता तंबूमध्ये परतला. पहिल्या दोन सामन्यात त्याला मिचेल स्टार्कने बाद केले होते, तर तिसऱ्या सामन्यात तो एश्टन एगरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता. भारताने मालिका गमावण्यात त्याचा सर्वात मोठा वाटा आहे.

२७० धावांचा पाठलाग करताना भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्या होत्या. विराट आणि हार्दिक खेळपट्टीवर थांबले होते. त्यावेळी भारताचा विजय निश्चित दिसत होता, मात्र एश्टन एगरने सलग दोन चेंडूंवर कोहली आणि सूर्यकुमारला बाद करून भारताला अडचणीत आणले. यानंतर हार्दिक आणि जडेजा मिळून भारताला विजय मिळवून देऊ शकतील असे वाटत होते. त्यावेळीही झंम्पाने दोघांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी २० षटकात ८६ धावा देत सहा महत्त्वपूर्ण बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाच्या अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी खेळली नाही. बहुतांश फलंदाजांनी खराब फटके खेळून विकेट गमावल्या. स्टीव्ह स्मिथ वगळता प्रत्येक ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला, पण अर्धशतकही झळकावता आले नाही. दोन फलंदाजांनी ३० पेक्षा जास्त धावा केल्या, तर चार फलंदाजांनी २०-३० च्या दरम्यान धावा केल्या. यापैकी कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी केली असती तर कांगारू संघाला ३०० च्या जवळपास धावा करता आल्या असत्या.

अॅडम झंम्पाला सामनावीर तर मिचेल मार्शला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

३१ मार्च पासून आयपीएल २०२३ चा १६ वा हंगाम सुरू होत आहे. १० संघांमध्ये दोन गटांत ७० साखळी सामने होणार आहेत. देशभरातल्या १२ ठिकाणी ५२ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.

आयपीएलनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्व कसोटी विजेतेपदासाठी निर्णायक सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे.

टीम झुंजार