जळगावात रमाई जयंतीनिमित्त मिरवणुकीसह प्रबोधन सभेचे आयोजन
जळगाव, ता. 7 : माता रमाई आंबेडकर हे आता एका व्यक्तीचे नाव उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनलेली आहे. जगात जे थोर महान पुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरांतील महिलांचा/धर्मपत्नीचा सिंहाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशामागे त्यांच्या आई जिजाऊंचा वाटा होता, महात्मा जोतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा सिंहाचा वाटा होता त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात, त्यांच्या थोर कार्यात सुशील कर्तव्यदक्ष त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचा आदर्श आजच्या पिढीने जपणे गरजेचे आहे, असे मत जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी व्यक्त केले.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 358 ग्रुप जळगाव शहरतर्फे आज सोमवार, दि.7 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित मिरवणूक व प्रबोधन सभेत त्या बोलत होत्या. सुरूवातीला शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करून नजीक सजविलेल्या रथावरील माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गुलाबपुष्पाच्या पाकळ्या अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर मिरवणुकीचा प्रारंभ होऊन विविध घोषणा देत, वाजतगाजत, गुलाबपाकळ्यांचा वर्षाव करीत जिल्हा न्यायालय मार्गाने रेल्वेस्थानकानजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाबाई आंबेडकरांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर याच परिसरात प्रबोधन सभा झाली. या कार्यक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. श्री.राजेश झाल्टे, श्री.सुमित्रा अहिरे, श्री.राजूभाऊ खैरे, माजी नगरसेवक श्री. राजूभाऊ मोरे, नगरसेवक श्री.सुरेश सोनवणे, संघमित्रा सौ.ताई इंधाटे, श्री.मुकेश सावकारे, श्री.सचिन बिर्हाडे, श्री.विजय निकम, समाजसेवक श्री.राधेभाऊ शिरसाठ, श्री.विशाल अहिरे, श्री.मंगेश निळे, श्री.भारत सोनवणे, श्री.शांताराम अहिरे यांच्यासह 358 ग्रुप जळगाव शहर संस्थापक श्री.अजय गरुड, अध्यक्ष श्री.पंकज सोनवणे, उपाध्यक्ष श्री.गणेश पगारे, सचिव श्री. सुनील शिरसाठ, सहसचिव श्री.नितीन अहिरे, श्री.अक्षय तायडे, श्री.संदीप वाघ, श्री.ललित पारधी, श्री.राज डोंगरे, श्री.रोहन साळुंखे, श्री.विशाल बाविस्कर, श्री.रोहन अवचारे, श्री.सुमित सोनवणे, श्री.हर्षल अहिरे, श्री.बबलू सोनवणे, श्री.राकेश सुरवाडे, श्री.आकाश पठारे, श्री.आकाश नरवाडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,