प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल- धुळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणा-या मारोती artigaaच्या समोर अचानक वाहन आल्यामुळे मारोती आणि जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाल्यामुळे मारोती मधील वयोवृद्ध भाऊ व बहिण जागीच ठार झाले तर अन्य पाच जण जखमी झाले जखमींमध्ये एक पुरुष व एक महिलेची प्रकृती गंभीर असून एका लहान मुलाचा पाय तुटला आहे तर एक मुलगी व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे दाखल करण्यात आले असून अन्य तीन जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून देव दर्शन करून घराकडे परतणा-या जळगाव येथील प्रतापनगरमधील नरेंद्र जैन परिवारावर रस्त्यावरच काळाने घाला घातला.हा अपघात आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल कृष्णाजवळ झाला.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तास ठप्प होऊन दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
याबाबत माहिती अशी की,जळगाव येथील प्रताप नगरमधील नरेंद्र निहाल्चन जैन हे परिवारासह धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथे रामदेवजी बाबा यांच्या दर्शनासाठी गेले होते.धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर नरेंद्र जैन हे मारोती क्रमांक एम.एच.१९ सी.व्ही.७७१७ ने जळगाव येथे घरी जात होते.एरंडोल पासून दोन किलोमीटर अंतरावर हॉटेल कृष्णाजवळ त्यांच्या वाहानासमोर अचानक वाहन आल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याच वेळी जळगाव कडून धुळ्याकडे जात असलेली ट्राला क्रमांक एम.एच.४६ बी.बी.८५३२चा समोरासमोर अपघात झाला.या अपघातात मारोतीमधील कमलाबाई निहालचंद जैन वय-६५ व त्यांचे भाऊ प्रकाशचंद्र राजमल बागरेचा वय-७० या भाऊ बहिणीचा जागीच मृत्यू झाला.
तर योगीताबाई नरेंद्र जैन,विजय शांतीलाल जैन हे गंभीर जखमी झाले.तर नमन नरेंद्र जैन या बारा वर्षीय मुलाचा पाय तुटून तो गंभीर जखमी झाला.तर त्याची बहिण लाभोनी नरेंद्र जैन व वडील नरेंद्र जैन किरकोळ जखमी झाले.अपघातात मयात झालेले प्रकाशचंद्र बागरेचा हे नरेंद्र जैन यांचे मामा असून कमलाबाई जैन ह्या आई आहेत.तर नमन जैन आणि लाभोनी जैन हे दोन्ही नरेंद्र जैन यांचे मुले आहेत.नरेंद्र जैन हे स्वत: वाहन चालवत होते.अपघात झाल्यानंतर मारोमध्ये असलेले दोन्ही बलून उघडल्यामुळे चालक नरेंद्र जैन यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाल्यामुळे हॉटेल कृष्णाचे संचालक कृष्णा धनगर,डॉ.राजेंद्र चौधरी,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर व हॉटेल मधील सर्व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी देखील अपघातस्थळी धाव घेवून मदत कार्य सुरु केले.महामार्गावरून जात असलेले जिल्हा बँकेचे संचालक तथा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी देखील अपघातस्थळी थांबून ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथे अपघाताची माहीती देऊन जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचेसह हवालदार अनिल पाटील,अकिल मुजावर,विकास खैरनार,राजेश पाटील,संदीप पाटील,संतोष चौधरी,पंकज पाटील यांनी अपघातस्थळावरून अपघातग्रस्त वाहने दूर करून ठप्प झालेली वाहतून सुरळीत केली.तसेच गंभीर जखमींना पोलीस वाहनातून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.जखमींवर ग्रामीण रुग्णालयात डॉ.कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले.
माझ्या मुलाला वाचवा हो- वडिलांची वाहन चालकांना विनवणी.
अपघातात जैन परिवारातील सर्व सदस्य जखमी झाले होते.केवळ नरेंद्र जैन याना किरकोळ दुखापत झाली होती.नरेंद्र जैन यांच्यासमोर त्यांचा बारावर्षीय मुलगा नमन हा गंभीर जखमी होऊन रक्तबंभाळ झाला होता.वडील नरेंद्र जैन हे वाहन चालकांना विनवणी करून माझ्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी मदत करा अशी विनवणी करीत होते.माझ्या मुलाला तरी वाचवा हो असे रडून सांगत होते,मात्र रस्त्यावरून जाणा-या कोणत्याही वाहन चालकाने त्यांना मदत केली नाही.
त्याचवेळी जळगाव जनता बँकेचे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य तथा सकाळचे तालुका बातमीदार आल्हाद जोशी,सदस्य निलेश ठाकूर आणि तक्रार निवारण समितीचे सदस्य अजेंद्र पाटील हे जळगाव येथून एरंडोल येथे येत होते.त्यांनी अपघात झाल्याचे दिसताच वाहन थांबवले आणि नरेंद्र जैन यांची मुलाला वाचवण्यासाठी असलेली धडपड पाहिली.क्षणाचाही विलंब न लावता बँकेचे तक्रार निवारण समितीचे सदस्य अजेंद्र पाटील यांनी गंभीर जखमी असलेल्या नमन जैन,लाभोनी जैन आणि नरेंद्र जैन यांना आपल्या वाहनातून कल्पना हॉस्पिटल येथे दाखल केले.तसेच नरेंद्र जैन यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती देऊन तिघाही जखमींना मानसिक धीर दिला.