IPL:हैदराबादची पंजाबवर आठ विकेट्सने मात, धवनची एकाकी झुंज व्यर्थ

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ मधील डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर आठ विकेट्स राखून विजय मिळविला. विजयासाठीचे १४४ धावांचे लक्ष्य सनरायजर्स हैदराबादने निर्धारित १७.१ षटकांत २ बाद १४५ धावा करीत साध्य केले. २ बाद ४५ अशा निराशाजनक सुरुवातीनंतर डाव सावरत राहुल त्रिपाठी (४८ चेंडूंत नाबाद ७४) आणि कर्णधार एडन मार्करम (२१ चेंडूंत नाबाद ३७) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. राहुल त्रिपाठीने ३५ चेंडूंत दोन षटकार आणि सात चौकार लगावत अर्धशतक झळकविले.

त्याआधी, सलामीवीर प्रभसिमरन सिंग डावाच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाल्यानंतर पंजाबचा संघ नऊ फलंदाज बाद होईपर्यंत सावरू शकला नाही. त्यांच्या फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर येऊन हजेरी लावून जाण्याचेच काम जणू केले. मॅथ्यू शॉर्ट (३ चेंडूंत १), जितेश शर्मा (९ चेंडूंत ४), सिकंदर रझा (६ चेंडूंत ५), एम. शाहरूख खान (३ चेंडूंत २२), हरप्रीत ब्रार (१५ चेंडूंत २२), राहुल चहर (१५ चेंडूंत २२), नॅथन एलिस (१५ चेंडूंत २२) यांना दुहेरी आकड्याची धावसंख्या गाठण्यात अपयश आले.

मोहित राठीने (२ चेंडूंत नाबाद १) सुमारे २५ मिनिटे खेळपट्टीवर उभे राहत शिखर धवनला अपेक्षित साथ दिली. ९ बाद ८८ धावसंख्या असताना मोहित खेळपट्टीवर आला होता. दहाव्या विकेटसाठी प्रथमच ५५ धावांची भागीदारी झाली. शिखरने ६६ चेंडूंत नाबाद ९९ धावा करताना १२ चौकार आणि पाच षटकार लगावले. सनरायजर्स हैदराबादच्या मयांक मार्कंडेने १५ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स मिळवल्या. मार्को जानसेन आणि उमरान मलिक यांनी दोन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारने एक फलंदाज बाद केला.

शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे देखील वाचा

टीम झुंजार