मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएलच्या १६व्या मोसमात खराब सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाब किंग्जनंतर त्याने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. हैदराबाद आणि कोलकाता संघ शुक्रवारी (१४ एप्रिल) ईडन गार्डन्सवर आमनेसामने आले. या सामन्यात यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली हैदराबादने २३ धावांनी विजय मिळवला.
कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्सने षटकांत ४ बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ७ गडी गमावून २०५ धावाच करता आल्या.
आयपीएल २०२३ मधील पहिले शतक १३.२५ कोटींचा इंग्लंडचा युवा स्टार खेळाडू हॅरी ब्रूक याने झळकावले. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना हॅरी ब्रूकने शुक्रवारी (१४ एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्समध्ये विरुद्ध शतक झळकावले. हॅरी ब्रूकने ईडन गार्डन्सवर ५५ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि तीन षटकार मारले. आयपीएलच्या १६व्या मोसमातील हे पहिले शतक आहे. कर्णधार एडन मार्करामने २६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३२ आणि हेनरिक क्लासेनने सहा चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. मयंक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी प्रत्येकी नऊ धावा करून बाद झाले.
कोलकाताला शेवटच्या षटकात ३२ धावांची गरज होती. रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर खेळपट्टीवर होते. रिंकूने गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात २९ धावांचा पाठलाग केला होता, मात्र यावेळी चमत्कार घडला नाही. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादव बाद झाला. त्यानंतर केवळ आठ धावा झाल्या. रिंकूने षटकार मारला पण तो पुरेसा नव्हता. रिंकू सिंगने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार नितीश राणाने ४१ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. एन जगदीशनने २१ चेंडूत ३६ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने १२ आणि व्यंकटेश अय्यरने १० धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेल तीन आणि उमेश यादव एकच नाबाद धावा करू शकले. रसेलने गोलंदाजीत तीन विकेट घेतल्या, पण फलंदाजीत तो अपयशी ठरला. गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. त्याला मैदानाबाहेरही जावे लागले. तरीही तो कसा तरी फलंदाजीला आला, परंतु चमत्कार करू शकला नाही. रहमानउल्ला गुरबाज आणि सुनील नरेन यांना खातेही उघडता आले नाही. सनरायझर्सकडून मार्को जॅनसेन आणि मयंक मार्कंडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
या विजयासह सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. चार सामन्यांत दोन विजयानंतर त्याचे चार गुण आहेत. हैदराबादला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतरही कोलकाता संघ गुणतालिकेत अव्वल चारमध्ये कायम आहे. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभवानंतर ते चौथ्या स्थानावर आहेत. त्यांचे चार गुण आहेत.
हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.