व्यंकटेशच्या शतकावर किशनचे अर्धशतक पडले भारी; मुंबईने कोलकात्यावर पाच गडी राखून मिळवला दुसरा विजय.

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडिअन्स महिला संघाची जर्सी परिधान करून पुरूषांचा संघ मैदानावर उतरला आणि कोलकाताविरुद्ध पाच गडी राखून विजय नोंदवला. व्यंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १७.४ षटकांत ५ बाद १८६ धावा करून सामना जिंकला. मुंबईकडून इशान किशनने ५८ धावा केल्या.

मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माला पोटाचा त्रास होता. अशा परिस्थितीत सूर्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आणि त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमधला पहिला सामना खेळताना अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीला सुरुवात केली, पण तो फार काही करू शकला नाही. त्याने दोन षटकात १७ धावा दिल्या. यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. कोलकाताची सुरुवात काही खास नव्हती. नारायण जगदीसन खाते न उघडता कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला.

११ धावांवर कोलकात्याची पहिली विकेट पडली आणि वेंकटेश फलंदाजीला आला. त्याने खेळपट्टीवर येताच मोठे फटके खेळायला सुरुवात केली. तथापि, वेंकटेश अय्यर ग्रीनकडून चेंडू स्कूप करण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला आणि त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर फिजिओ मैदानावर आला आणि त्याला वेदनाशामक औषधे दिली आणि त्यानंतर व्यंकटेशने चौकार आणि षटकार मारले. केकेआरसाठी केवळ अय्यरला शानदार खेळी करता आली, तर इतर फलंदाजांनी निराशा केली.

या सामन्यादरम्यान केकेआरचा नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा हृतिक शोकीन यांच्यातील चकमक पाहायला मिळाली. केकेआरच्या डावाच्या नवव्या षटकात शोकीनने राणाला बाद केल्यानंतर त्याला काहीतरी म्हटल्याची घटना घडली. हे पाहून केकेआरचा कर्णधार भडकला आणि त्यानेही परतताना गोलंदाजाला काहीतरी बडबडला. सूर्यकुमार आणि पियुष चावला यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. राणा आणि शोकीन दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतात, पण ड्रेसिंग रूममध्येही दोघांमध्ये चर्चा होत नाही. याआधीही दोघांमध्ये वाद झाले आहेत.

अय्यरने छोट्या भागीदारी रचत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नारायण जगदीशन शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने रहमानउल्ला गुरबाजसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. गुरबाज आठ धावा करून बाद झाला. कर्णधार नितीश राणा (५) लवकर तंबूमध्ये परतला. पण एका टोकाला उभ्या असलेल्या अय्यरने आपली भूमिका चांगलीच निभावली आणि छोट्या भागीदारी रचत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. त्याने शार्दुल ठाकूरसोबत चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने रिंकू सिंगसोबत पाचव्या विकेटसाठी ३६ धावांची उपयुक्त भागीदारी केली. यानंतर ५१ चेंडूत १०४ धावा करून तो बाद झाला. केकेआरकडून शतक झळकावणारा अय्यर हा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी ब्रेंडन मॅक्क्युलमने शतक झळकावले होते. त्याच्या आधी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हॅरी ब्रूकने मोसमातील सर्वात जलद शतक झळकावले होते. त्याने केकेअार विरुद्ध ५५ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. व्यंकटेशने त्याला मागे टाकले.

या सामन्यात रिंकू सिंगही काही विशेष करू शकला नाही आणि १८ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. शेवटी आंद्रे रसेलने ११ चेंडूत २१ धावा करत संघाची धावसंख्या १८५ धावांपर्यंत पोहोचवली. मुंबईकडून हृतिक शोकीनने दोन बळी घेतले. अर्जुन वगळता मुंबईच्या इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रोहित शर्मा प्रभावशाली खेळाडू म्हणून या सामन्यात आला आणि त्याने इशान किशनसह डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या षटकात फक्त दोन धावा केल्या, पण दुसऱ्या षटकात इशान किशनने हात उघडले आणि दोघांनीही झटपट धावा काढल्या. पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित सुयश शर्माचा बळी ठरला. १३ चेंडूत २० धावा केल्यानंतर तो बाद झाला, मात्र तोपर्यंत मुंबईची धावसंख्या ६५ धावा झाली होती. पॉवरप्लेमध्ये मुंबईने एक गडी गमावून ७२ धावा केल्या आणि सामन्यावर पकड मिळवली.

रोहित बाद झाल्यानंतर इशान किशनही २५ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. यावेळी मुंबईची धावसंख्या ८७ धावा होती. यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा मार्ग सुकर केला. तिलक २५ चेंडूत ३० आणि सूर्यकुमार २५ चेंडूत ४३ धावा करून बाद झाले. मात्र, सूर्या बाद होण्यापूर्वी मुंबईची धावसंख्या १७६ धावांपर्यंत पोहोचली होती आणि सामन्यात केवळ औपचारिकता उरली होती. यानंतर नेहल वढेराही सहा धावा करून बाद झाला. टीम डेव्हिडने १३ चेंडूत २४ धावा करत सामना संपवला.

कोलकातासाठी केवळ सुयश शर्माच प्रभाव पाडू शकला. त्याने २७ धावांत दोन गडी बाद केले. शार्दुल, चक्रवर्ती आणि फर्ग्युसन यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली, मात्र तिन्ही गोलंदाज दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरले. सलग दुसऱ्या विजयासह मुंबईचा संघ गुणतक्त्यात आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

वेंकटेश अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

टीम झुंजार