IPL: दिल्लीने कोलकात्यावर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या २८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा चार विकेट्सने पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत १२७ धावा केल्या. जेसन रॉयने ३९ चेंडूत ४३ धावा केल्या तर आंद्रे रसेलने ३१ चेंडूत ३८ धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ सहज विजयाकडे वाटचाल करत होता. डेव्हिड वॉर्नर ५७ धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने कोलकाता सामन्यात पुनरागमन करत होता. शेवटी दिल्लीला सहा चेंडूत सात धावा हव्या होत्या. अक्षर पटेलने विजय मिळवून दिला. अक्षरने २२ चेंडूत १९ धावांची नाबाद खेळी खेळली. तर ललित यादव चार धावा करून नाबाद राहिला.

या मोसमात दिल्लीचा हा पहिला विजय ठरला. याआधी हा संघ सलग पाच सामने हरला आहे. त्यांच्याकडे सहा सामन्यांतून एक विजय आणि पाच पराभवांसह दोन गुण आहेत. गुणतक्त्यात संघ तळाच्या १०व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा सहा सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला. हा संघ दोन विजय आणि चार गुणांसह आठव्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ आठ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. लखनौही आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्ज सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दिल्लीचा कोलकात्यावरचा हा सलग तिसरा विजय आहे. याआधी २०२२ मध्ये या संघाने सलग दोन सामन्यात कोलकाताचा पराभव केला होता. २३ महिन्यांनंतर आयपीएल सामना खेळणाऱ्या इशांत शर्माला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. इशांतने यापूर्वी २ मे २०२१ रोजी पंजाब विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघ २० षटकांत १२७ धावांवर गारद झाला. कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट गमावल्या. लिटन दास चार, कर्णधार नितीश राणा चार, मनदीप सिंग १२ धावा, रिंकू सिंग सहा धावा आणि सुनील नरेन चार धावा करून बाद झाले. व्यंकटेश अय्यर आणि अनुकुल रॉय यांना खातेही उघडता आले नाही.

सामन्यात एकवेळ कोलकाताने ९६ धावांत नऊ विकेट गमावल्या होत्या. या ९६ पैकी ४३ धावा जेसन रॉयच्या होत्या. जेसनने ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. कुलदीपने १५व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले पण त्याची हॅटट्रिक हुकली. जेसनला अमन खानने झेलबाद केल्यानंतर कुलदीपने प्रभावशाली खेळाडू अनुकुल रॉयला पायचीत बाद केले.

उमेश यादव तीन धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने मुकेश कुमारला लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. यातील एक षटकार १०९ मीटरचा होता. वरुण चक्रवर्ती (१) शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. रसेलने ३१ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावा केल्या.

२३ महिन्यांनंतर आयपीएलमध्ये सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने शानदार पुनरागमन केले. त्याने चार षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. याशिवाय एनरिक नॉर्ट्झ, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुकेश कुमारला एक विकेट मिळाली.

१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करत पहिल्या चार षटकात ३४ धावा केल्या. मात्र, पृथ्वी शॉचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो ११ चेंडूत १३ धावा काढून बाद झाला. यानंतर मिचेल मार्शही दोन धावा करून बाद झाला.

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या फिलिप सॉल्टला पाच धावा करता आल्या. यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी चौथ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. दरम्यान, वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीतील ५९ वे अर्धशतक झळकावले. त्याचवेळी त्याचे या मोसमातील हे चौथे अर्धशतक ठरले. वरुण चक्रवर्तीने वॉर्नरला पायचीत टिपले. तो ४१ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाला.

मनीष पांडे २३ चेंडूत २१ धावा करून बाद झाला, तर अमन हकीम खान खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेर अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी दिल्लीला विजय मिळवून दिला. अक्षर २२ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने १९ धावा करून नाबाद राहिला, तर ललितने नाबाद ४ धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण, अनुकुल रॉय आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

टीम झुंजार