पत्नी,सासू व प्रियकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : पत्नीचे अन्य पोलीस हवालदारासोबत असलेल्या अनैतिक संबंधांना कंटाळून एका पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विठाबाई पांडुरंग बोराडे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश पांडुरंग बोराडे (वय ३६, रा. लहवित, देवळाली कॅम्प) असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. संशयित पत्नी सुजाता योगेश बोराडे ऊर्फ सुजाता देविदास वाळुंज (वय २९), सत्यभामा देविदास वाळुंज (वय ४८), गणेश कोठुळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बोराडे यांनी पत्नीचे संशयित गणेश कोठुळे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून आत्महत्या केली. या प्रकरणात मयताची पत्नी, तिचा प्रियकर व पत्नीची आई अशा तिघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बोराडे व सुजाता यांनीफारकतीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. सुजाताने पतीकडे २५ लाख रुपये तडजोड रक्कम दे, नाहीतर तुला शेती, घर विकायला लावेल, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस गिते करीत आहेत.






