IPL: राशीद-हार्दिकमुळे ३७ चेंडू शिल्लक असताना गुजरातने जिंकला सामना; राजस्थानचा सलग दुसरा पराभव

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ४८ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सातवा विजय मिळवला आहे. त्यांनी शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने राजस्थानकडून मागील पराभवाचा बदला घेतला. त्यांच्यासाठी या सामन्यात गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही धडाकेबाज पद्धतीने सामना संपवला. गुजरातने हा सामना ३७ चेंडू राखून जिंकला.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ १७.५ षटकांत ११८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने १३.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा करून सामना जिंकला. गुजरातचे १० सामन्यांत १४ गुण झाले आहेत. गुजरातचा संघ केवळ तीन सामने हरला आहे. दुसरीकडे, या पराभवानंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे १० सामन्यांत १० गुण आहेत. राजस्थानचे पाच विजय आणि पाच पराभव झाले आहेत.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने चांगली सुरुवात केली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ९.४ षटकात ७१ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ३५ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर वृद्धिमानने कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. साहाने ३४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. त्याचवेळी हार्दिकने १५ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिला. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ३० धावा केल्या. ट्रेंट बोल्टने १५, यशस्वी जैस्वालने १४ आणि देवदत्त पडिक्कलने १२ धावा केल्या. या चार फलंदाजांशिवाय दुहेरी आकडा कुणालाही स्पर्श करता आला नाही. गुजरातच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी. राशिद खानने तीन आणि नूर अहमदने दोन गडी बाद केले. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि जोश लिटल यांना प्रत्येकी एक यश मिळाले. ११८ धावा ही राजस्थानची जयपूरमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.

राशिद खानला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

टीम झुंजार