पाचोरा : शहरातील चौदा वर्षीय मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे.या अमानुष व अमानवी घटनेमुळे शहराच्या नैतिकतेला व वैभवाला काळिमा फासला गेला आहे.
पाचोरा शहरातील या धक्कादायक प्रकरणात पीडित मुलगी २७ एप्रिलला घरातून काही न सांगता निघून गेल्याने तिच्या आजीने नात बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी तिचा शहरभर शोध घेतला असता ती २८ एप्रिलला भडगाव रोड भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आली.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवाना केले होते. तेथील यंत्रणेने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाल्याने समितीने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली.
उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेने संशयित सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.
घटनास्थळ आणि घटनेतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी पीडितेला पाचोरा येथे आणले असता तिने सातही तरुणांची ओळख पटवली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या ६५ वर्षीय वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख तपास करीत आहेत.
हे देखील वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम