मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएलच्या ५१व्या सामन्यात रविवारी (७ मे) पहिल्यांदाच दोन भाऊ एका सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरले. गुजरात टायटन्सचा हार्दिक पंड्या आणि लखनौ सुपरजायंट्सचा कृणाल पंड्या आमनेसामने आले. या सामन्यात हार्दिकने मोठ्या भावाचा पराभव करत विजय मिळवला. गुजरातने ५६ धावांनी मोठा विजय मिळवला. त्याने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.
लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कृणालचा हा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातने २० षटकांत २ बाद २२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावाच करू शकला.
गुजरातचे ११ सामन्यांत १६ गुण आहेत. गुजरातचा हा आठवा विजय आहे. त्यांना या मोसमात केवळ तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, लखनौचा ११ सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांना पाच विजय मिळाले आहेत. एका सामन्यात निकाल लागला नाही. लखनौचे ११ गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहे.
२२८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाची सुरुवात चांगली झाली. काइल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ८८ धावांची भागीदारी केली. मेयर्स ३२ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला.
त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. मेयर्स बाद झाल्यानंतर डी कॉक एका टोकाला उभा राहिला. दुसऱ्या टोकाला एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. डिकॉक १६व्या षटकात बाद झाला. त्याने ४१ चेंडूत ७० धावा केल्या. डिकॉकने सात चौकार आणि तीन षटकार मारले. लखनौच्या मधल्या फळीने या सामन्यात खराब कामगिरी केली. दीपक हुडा ११, मार्कस स्टोइनिस चार आणि निकोलस पूरन तीन धावा करून बाद झाले. अखेरच्या षटकात प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आयुष बडोनीने काही प्रयत्न केले, पण तोपर्यंत सामना हाताबाहेर गेला होता. बडोनीने ११ चेंडूत २१ धावा केल्या. कर्णधार कृणाल पंड्या खातेही उघडू शकला नाही. रवी बिश्नोईने चार आणि स्वप्नील सिंगने दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. या मोसमात पुनरागमन करणाऱ्या मोहित शर्माने पुन्हा एकदा छाप पाडली. त्याने चार षटकात २९ धावा देऊन चार बळी घेतले. मोहितने काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी आणि कृणाल पांड्याला बाद केले. मोहम्मद शमी, नूर अहमद आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली. गिलने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. वृद्धिमान साहाने ४३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. त्याने १० चौकार आणि चार षटकार मारले. डेव्हिड मिलरने १२ चेंडूत २१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार हार्दिक पंड्याने १५ चेंडूत २५ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. लखनौकडून मोहसीन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शुभमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे देखील वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४